घरात कधीतरी ते अमक्या जातीचे आहेत असा दबक्या आवजात भुवया उंचावून झालेला संवाद, पुसटसा का होईना पोरांच्यात उतरतो. तो रंग ‘अमक्यांचा’ असतो, तू काय ‘तमक्यातली’ आहेस का तसला ड्रेस घ्यायला? असे म्हणून रंग वाटून घेतले जातात. अशा कैक घरांचे मग गाव होते. गावाचा तालुका, तालुक्याचा जिल्हा, जिल्ह्यांचे राज्य अन राज्यांचा देश.
मग कॉलेजच्या मेरीट लिस्ट वर विशिष्ट जातीच्या मुलांना कमी गुण मिळूनही प्रवेश मिळाला अन आपण काय पाप केल ही भावना डंख मारू लागते किंवा मग फी मध्ये अमक्या जणांना तमुक सूट कशाला म्हणून नसा फुगतात. या एकूण प्रक्रियेत मग दुराग्रह आकार घेतात. दृष्टी अधू होत जाते.
दरम्यानच्या काळात ‘जात’ सर्वांच्याच आयुष्यात डोकावत नाही. ‘जगताना’ जात ज्यांच्या कधी आडवी आलीच नाही त्यांची भावना मग सहज अशी असते- कुठेय जात? कुठेय भेदभाव? असा प्रश्न पडू लागतो. ‘त्याचं बर आहे, आपणच कमनशिबी’ अशा सौम्य प्रतिक्रियेपासून ते ‘माजलेत साले, भिकारी फुटके कुठले’ अशी मजल मारली जाते.
मग एके दिवशी या देशातल्या सर्वोत्तम शैक्षणिक संस्थेत गणल्या जाणाऱ्या आयआयटी बॉम्बे मध्ये होस्टेलच्या इमारतीवरून दर्शन सोळंकी नावाचा अठरा वर्षाचा पोरगा धाडकन खाली पडतो. आयुष्य नावच स्वप्न रक्ताच्या थारोळ्यात उद्ध्वस्त होत. त्याच्या आईने फोडलेला टाहो वर्तमानपत्राच्या एका कोपऱ्यात तसाच पडून राहतो. अरे त्या कोपऱ्यात बघा, त्या मायच्या डोळ्यात समाज म्हणून आपल नाकर्तेपण दिसतय अस ओरडू वाटल तरी गोंगाट फार असतो. नुसती घाईगर्दी, धावाधाव.
पण मग जाणवत दर्शन कोसळण्याच्या आधीच हा समाज केव्हाचाच पडला आहे.
जात व्यवस्थेच्या आड उभे राहून दात विचकत माणसांनी माणूस मारल्याचे दर्शन हे एकमेव उदाहरण नाही. शिवाय तो अपवाद देखील नाही, उलटा असेलच तर तो या समाजाचा नियमच आहे. मुख्य प्रवाहात दर्शन ठळकपणे दिसला इतकेच बाकी वाड्या वस्त्यांवरचे, स्त्रियांच्या आयुष्यातले अन लेकरांच्या जडणघडणीतले जातीचे विवेचन अधिक थरकाप उडवणारे आहे. जात समाजाच्या मानगुटीवर तशीच लटकली आहे. ती आपल्याला स्पष्ट दिसत नाही इतकेच किंवा मग आपण डोळे मिटून दूध पितो असा त्याचा अर्थ. बलात्कार, गरिबी, भूकबळी, शिक्षण, आरोग्य, कुपोषण; समाजातल्या कुठल्याही दाहकतेचे स्वरूप उलगडताना त्यात जातीचे प्रकटीकरण आहेच. हातच्या काकणाला आरसा नको म्हणून मुद्दामहून आकडे मांडायचे टाळतो आहे.
जातीवर बोलायचं कुणी? इथली कुटुंबव्यवस्था जातीयवादी आहे. शालेय जीवनात जात चर्चिली जात नाही. परिणामे जातीचे संवेदीकरण कुठल्याच टप्प्यावर झाले नसल्याने सुप्तपणे जातीवाद तग धरून राहतो. मग तो उफाळून येतो मेरीट लीस्ट बघून किंवा फी बघून. त्याच्या पलीकडे आपले जातीचे आकलन नाही. माणसासारखी दिसणारी माणस पण त्यात भिन्नता का? आपण अन ते आगळे का? समजण्या, न समजण्याच्या वयात असे प्रश्न पडत नाहीत असे नाही पण ते विचारावे कुणाला हा प्रश्न आहे. रंगातली जात सांगणाऱ्या कुटुंबाला कि त्यावर भाष्य टाळलेल्या शिक्षण व्यवस्थेला? भिन्नतेचे मूळ चर्चिले जाण्यापेक्षा तिचे उद्दातिकरणच अधिक होते.
दर्शन आयआयटीत येतो खरा पण मग त्याला रँक विचारली जाते. अरेच्चा म्हणजे खालची रँक अन तरीही आयआयटी बॉम्बे म्हणजे खालच्या जातीचा असणार. एकूण हेटाळणीचे उग्र रूप पाऊल टाकतो न तोवर समोर उभे असते. हळूहळू एक उदासीन कंपू सभोवताली उभा राहतो. अभिजन वातावरणात अगदी कपड्यांपासून ते खाण्यापिण्यात पदोपदी तो बाहेर फेकला जातो. त्याला कळत नकळत त्याच्या वर्गाची, जातीची जाणीव करून दिली जाते अन मेरीटवर म्हणजेच कर्तुत्वावर बोट ठेऊन आधीचा कैक पिढ्यांचा साचलेला न्यूनगंड अधिक बळकट केला जातो. पण -
आपल्या ‘मेरीटच्या’ व्याख्येत तसे काही ‘मेरीट’ नाहीच
वॉरन बफे यांनी ‘Ovarian lottery’ नामक संकल्पना वारंवार मंडळी आहे. त्याचा थोडक्यात सारांश असा कि तुम्ही कुठे, कुठल्या वेळी, कुणाच्या पोटी, कुठल्या धर्मात, कुठल्या जातीत जन्म घेता इत्यादी अनियोजित घटना आहेत. उच्च म्हणवल्या जाणाऱ्या जातीत, बहुसंख्याक धर्मात, सधन घरात जन्म घेणे हा मॅटर ऑफ चान्स म्हणजेच ‘संभावनेची शक्यता’ आहे. म्हणजे असे की-
‘कोटा’ नावाचा कोटा साऱ्यांना मिळत नाही. कोट्यातून आलेल्यांची एक मेरीट लीस्ट वेगळी लावल्यास कसे होईल? तिथले लाखोंचे बाजारभाव केवळ मुठभर जणांना परवडणारे. बहुतांश जणांची आयआयटी किंवा सरकारी मेडिकल कॉलेजची महत्त्वकांक्षा, तो देखण्या स्वप्नांचा कॅनव्हास परिस्थितीच्या फुफाट्यात केव्हाच फाटून जातो. अपुरी साधन, सुमार मार्गदर्शन वर जातीय आर्थिक उचलबांगडी. निव्वळ जिद्धीने कशाशी स्पर्धा करायची? अन फक्त जातीय पातळीवर विश्लेषण का करावे? वर्गीय दृष्टीकोनातून पाहिल्यास उच्च म्हणविल्या जाणाऱ्या जातींत असलेली तफावत देखील स्पष्ट होते. एकीकडे देशातले सर्वोच्च मार्गदर्शन दुसरीकडे स्टेट बोर्डाचे सुमार कॉलेज. एकीकडे झोपताना खाताना पिताना एसी अन दुसरीकडे हातावर असलेली पोट. कुठली स्पर्धा? कुठले मेरीट?
शिवाय अमुक परीक्षेतले मार्क म्हणजे मेरीट अशा संकुचित व्याख्या आपले अज्ञान अधोरेखित करतात. तो अनेकांपैकी एक निकष फारतर होऊ शकतो. यातून मग ही आजकालची रॅट रेस उभी राहते. योग्यतेचा आणखी वस्तुनिष्ठ अन व्यापक अर्थ आपल्याला गवसेल का? त्याला मानवी मुल्यांची, सहकाराची अन सद्भावनेची जोड देता येईल का?
आरक्षण का? कशाकरिता? यावर व्यापक चर्चा आपल्या कुणाच्या आयुष्यात कधी घडलीच नाही. उपेक्षित समाजाला अशा जागा का राखीव आहेत याचे नेमके उत्तर कधी कुणी दिलेच नाही. उपेक्षित समाजाची जडणघडण, त्यांचे प्रश्न, त्यांचा भूतकाळ, त्यांचा वर्तमान अन त्यांचे भविष्य यावर कुणी बोललेच नाही. ही संभाषणातील दरी जातव्यवस्थेची पुनर्स्थापना करत गेली आहे. समज गैरसमज अन त्यांचे बिनलाजी राजकारण्यांनी केलेले भांडवल यास अधिक खतपाणी घालत गेले.
विशिष्ट समूहावर हजारो वर्षे झालेला सामजिक भेदभाव, त्यांचे मुख्य प्रवाहातून केलेले विलीनीकरण, गावाच्या वेशीवरच्या झोपड्या, नाकारलेले पाणी, सावलीचा देखील केलेला अव्हेर, या सगळ्यातून घडणारी शारीरिक, मानसिक कुचंबना अन या साऱ्याचे मानसशास्त्रीय विश्लेषण हे व्यक्तीचे सामाजिकीकरण होत असताना कुठेच आढळून येत नाही.
ज्या आरक्षणाचे इतके जीव घेण्यापर्यंत भांडवल केले जाते त्या आरक्षणाने पंच्याहत्तर वर्षात कितपत दरी भरून काढली हा ही प्रश्न आहेच. आनंद तेलतुंबडे यांच्या ‘रिपब्लिक ऑफ कास्ट’ या पुस्तकात आरक्षण अन जाती व्यवस्थेचे उत्कृष्ट असे विवेचन केले आहे. आजचे आरक्षण नेमके उपेक्षित जणांपर्यंत पोहचते का? जाती निर्मुलनाची आपली वाट भटकली तर नाही? आरक्षणाच्या मूळ हेतुचाच आपल्याला विसर पडला आहे का? असे कैक प्रश्न आहेत. प्रस्तुत लेखात आरक्षणावर व्यापक लिहिता येणार नाही. त्यासाठी स्वतंत्र विवेचन आवश्यक आहे मुद्दा इतकाच की आरक्षणाकडे इतके सहज पाहता येणे शक्य नाही. राहिली गोष्ट त्याच्या आवश्यकततेची तर दर्शनच्या मृत्यूने ती अधोरेखित केली आहेच. शिवाय लगतच्या काळात हिंदुत्वाच्या राजकारणाने व्यापक सामाजिक पुनर्रचनेस हात घातला गेल्याने जात पडद्याच्या मागे जाऊन धार्मिक अस्मितेला महत्त्व प्राप्त होईल असे कैक अभ्यासकांचे मत फोल ठरते. जात वरवर पडद्याच्या मागे गेलेली दिसत असेलही तरीही जाती व्यवस्थेचे संस्थानीकरण आजही किती प्रबळ आहे याची साक्ष दर्शन देऊन गेला.
आपल्या जात व्यवस्थेला इतिहासच हजार वर्षांहून अधिक काळाचा आहे. ही तफावत कैक पिढ्यांची आहे. भारतीय स्वातंत्र्याच्या लढा हा निव्वळ राजकीय लढा नसून त्याला सामाजिक अधिष्ठान होते. संविधानाचा मसुदा म्हणजे क्रांती होय. संविधान म्हणजे नव्या युगाचे वचन. सुमारे पंच्याहत्तर सालापूर्वी हे तफावतींचे, भेदभावाचे जळमट कायमचे झुगारून नवक्षितिजाकडे भारत नव्याने झेप घ्यावा, जात-धर्म-पंथ-लिंग यांच्या पल्याड आपणाला पाहता यावे असे संविधान सभेतल्या आपल्या बापजाध्यांचे स्वप्न आपण कुठे नेऊन ठेवले आहे?
रोहित वेमुला, पायल ताडवी, चुनी कोटला, बाल मुकुंद, फातिमा लतीफ, प्रदीप मेघालय किंवा मग दर्शन सोळंकी हे हिमनगाचे वरवर दिसणारे वास्तव आहे. उमलू पाहणाऱ्या या जीवांच्या रक्ताचे डाग शुभ्र सदरा नेसलेल्या समाजावर कायमचेच. ही शिक्षण क्षेत्रातली परिस्थिती. व्यावसायिक, प्रशासकीय, सांस्कृतिक, साहित्यिक, राजकीय अन तत्सम क्षेत्रात जातीचे प्रकटीकरण दाहक आहे. स्त्रियांचे तर सामाजिक, जातीय अन पुरुषसत्ताक व्यवस्थेने केलेले बहुअंगी शोषण किळसवाणे आहे. आपल्याला याची जाणीव असावी इतकेच.
न्यायमूर्ती डी वाय चंद्रचूड यांनी काल हैदराबादेत विद्यार्थ्यांशी बोलताना ‘उपेक्षित समाजातील विद्यार्थ्यांच्या वाढत्या आत्महत्येचे प्रमाण फक्त आकडेवारी नसून ती उपेक्षित घटकांची हजारो वर्षांची कहाणी आहे’ असे नोंदवलेले निरीक्षण महत्त्वाचे आहे. प्रस्तुत विषयाला हात घालत कायद्यात ‘करुणेचे’ असलेले महत्त्व त्यांनी अधोरेखित केले. पण निव्वळ कायद्यातच कशाला एकूण आयुष्यात देखील आपणाला तो करुणेचा अंश सापडेल का?
जातीची, धर्माची, पुरुषसत्ताक अहंभावाची झापड बाजूला सारून काहींनाच हे जग पाहता येते. ते तसे ज्यांना दिसते त्यांनाच जगण्याचा अर्थ गवसतो. स्पर्धा, सत्ता, पैसा, स्वार्थ ही आधुनिकीकरणाच्या रेट्यात अधिक बळकट झालेली मुल्ये म्हणजे पोकळ डोलारा. आजच्या घडीला ‘माणूस’ होण्याचा प्रवासच महत्त्वाचा आहे.
- केतन गजानन शिंदे (राजन)
७०३८३१०३१५
..........................................................................................................
THE HIGHEST FORM OF KNOWLEDGE IS EMPATHY
- PLATO
..........................................................................................................


अप्रतिम....सखोल मांडणी ...सातत्य ठेव
ReplyDeleteप्रेरणादायी लिहलंय, भाऊ..!! ❤️
ReplyDelete