कोणता झेंडा घेवू हाती



बेशक प्रश्न हा आहे की कोण बरोबर आहे आणि कोण चुकीचं पण एक प्रश्न याहून महत्त्वाचा आहे. याहून गंभीर स्वरूपाचा आहे आणि कदाचित थोडा भाभडा देखील आहे. काही वेळासाठी सरहद पुसून टाकू. आता निष्पाप जीवांचे आकांत दोन्ही बाजूचे एकत्र करू. दोन्ही निष्पाप आत्म्यात काही फरक आहे का ? सरहद उभी राहिली की आम्ही उठतो एकमेकांचे रक्त प्राशन करायला. ही अन्यायाविरुद्ध उभी ठाकलेली क्रांती की विस्तारवादी प्रवृत्तीच्या तोंडाला सुटलेले ' रक्त '. आणि सरतेशेवटी तोच गांजा ' धर्म ' नावाचा. या तथाकथित धर्माच्या भांडवलदारांची फक्त लढाई व्हावी. फक्त राक्षसांचे युद्ध व्हावे , ही राक्षस जमात एकदाची नष्ट व्हावी. माणसं मरतात ती कायमची मात्र ही राक्षस जमात कीड आहे. ती पुन्हा पुन्हा वर येते. हे कधीपर्यंत ? अगदी शेवटपर्यंत आणि तोपर्यंत तुम्ही आम्ही हातावर हात ठेवून पाहत बसायचं. तुम्ही आम्ही फक्त निराशा व्यक्त करायची, चार ओळी सोशल मीडिया वर फेकायच्या आणि गप्प राहायचं. या तुम्ही आम्ही मध्ये संयुक्त राष्ट्र देखील मोडत, महसत्ता म्हणवणारी अमेरिका पण येते. माणसं वगैरे मरू दे, तू तेवढ्या माझ्या पोळ्या भाजून दे ! आज दोन देश धर्म नावाचा गांजा घेवून, मानवता वगैरे काहीतरी अस्तित्वात असते हे विसरून एकमेकांच्या उरावर बसत आहेत, इस्राएल आणि पॅलेस्टाईन ! 


मिडल इस्ट मध्ये झूम करून शोधावे लागणारे हे देश आजच नाही तर अनादी काळापासून जागतिक राजकीय समीकरण बदलत आले आहेत. आज प्राण मुकणारे निष्पाप जीव अनादी काळापासून झालेल्या चुकांना बळी ठरत आहेत. काल शस्त्र उचलली आणि आज लढाई आरंभली अस काही नसून याला अनेक वर्षांचा इतिहास आहे.
बायबल सांगते की अब्राहम हा आयसॅक आणि इशामील या दोन भावंडांचा बाप होता. आयसॅक मधून जुदैसम आणि इशामील मधून इस्लाम धर्माने जन्म घेतला. यातील अब्राहमचा नातू जाकोब पुढे इस्राएल झाला. याच इस्त्रायल वरून जेव्हा जिओनवाद ( झिओनिस्ट चळवळ ) सुरू झाली तेव्हा इस्राएल देशाची मागणी केली होती.


रोमन ज्युईश युद्ध असो, त्यानंतर अरब - इस्राएल युद्ध असो , याला लाख पदर. याचे पातक अनेक देशांच्या माथी आहे. इंग्लंड ने पहिल्या महायुद्धानंतर, ऑट्टोमन साम्राज्य धुळीस मिळाल्यावर जाहीर केलेली बाल्फोर घोषणा असो.त्यानंतर दुसरे महायुद्ध झाल्यावर संयुक्त राष्ट्राने केलेली फाळणी आणि मग अरब इस्त्राईल युद्धात जॉर्डन , इजिप्त , सीरिया , लेबोनोन यांनी आपल्या आपल्या भाजून घेतलेल्या पोळ्या असो. या जगात जितके अत्याचार झाले त्यातील सर्वात अधिक यहुदी लोकांवर झाले आणि ते कुणी केले हे सर्वज्ञात आहे. यहुदी लोकांसाठी इस्त्राईल उभा राहणे गरजेचे होते. ही त्यांच्या अस्तित्वाची लढाई होती. संयुक्त राष्ट्राने पॅलेस्टाईन मध्ये इस्राएल निर्माण केला आणि तो अशा रीतीने केला जेणे करून भविष्यात हा वाद कायम टिकून राहिला हवा. ब्रिटनची कठपुटली असलेला संयुक्त राष्ट्र बरोबर हवा तसा नाचला. दरम्यान इस्त्राईलने स्वतःला स्वयंभू केले. अरब पॅलेस्टाईन 1948 चे युद्ध जिंकून घेतले. पॅलेस्टाईन मध्ये तयार झालेला इस्त्रायल पॅलेस्टाईनला गिळंकृत करू लागला. 




संयुक्त राष्ट्रांची भूमिका काय होती ? पॅलेस्टाईन हा स्वतंत्र देश , इस्राएल हा स्वंतत्र देश आणि जेरुसलम ही राजधानी संयुक्त राष्ट्राच्या ताब्यात म्हणजेच आंतरराष्ट्रीय शहर म्हणून ओळखले जाणार होते. हे अरब लोकांनी मान्य केले नाही.याची परिणीती अरब इस्त्रायल युद्धात झाली. पॅलेस्टाईन ने आपली भूमी गमावली. पश्चिम जेरुसलम , इस्त्राईल ने ताब्यात घेतला , पूर्व जेरुसलम जॉर्डनने काबीज केला . ६७ साली झालेल्या सहा दिवसांच्या युद्धात 
( सिक्स डे वार ) इस्राएलने बहुतांश पॅलेस्टाईन गिळंकृत केले. बाकी जॉर्डन , इजिप्त, सीरिया वगैरे देश हाकलून परत लावले.


कहाणीचा इथे अंत नाही. विस्तारवादी चटक जेव्हा जेव्हा एखाद्या देशाला लागते तेव्हा तो अधिक राक्षस होत जातो. 
युरोपातील देश, झालेली महायुद्ध, हिटलर वगैरे याची उदाहरणे आहेत. इस्राएल अधिक राक्षस होत गेला. पॅलेस्टाईन अधिक कमजोर होत गेला. माणूस कितीही कमजोर असला तरी अस्तित्वासाठी लढतोच. आधी इस्राएल लढत होते आता पॅलेस्टाईन लढत आहे. ८७ साली आणि २००० साली असेच उठाव झाले , त्यावर युद्धविराम दिले , ते विराम पूर्णविराम नसून अर्धविराम होते. १९९७ आणि २००५ साली झालेले पॅलेस्टाइन इंटीफडा हे यात मोडतात. बाकी संघर्ष चालू राहिला. 






इतके वर्ष , इतके निष्पाप जीव गेल्यावर आता पुन्हा नक्की काय झालं. जेरुसलम मध्ये ३५ एकरात ओल्ड सिटी म्हणून जागेत मुस्लिमांची अल अस्का ही मज्जिद आणि डोम ऑफ रॉक आहे. इथेच यहुदी लोकांची वेस्टर्न वॉल किंवा वेलिंग वॉल आहे. या पस्तीस एकर मधून युद्ध पेटवली जातात. भासत असलेले हे राजकीय युद्ध , धार्मिक युद्ध आहे. १० मे रोजी याच मज्जिदित इस्राएल आणि पॅलेस्टाईन लोकात रमदान मध्ये तू तू मी मी  झालं. इस्राएलच्या बारुदबंदुका पुढे पॅलेस्टाईन लोकांचे दगड धोंडे काम करणार नव्हते. परंतू पॅलेस्टाईन शांत बसणार नव्हत. इस्राएलला हेच हवे आहे. पॅलेस्टाईन पेटून उठावा. मग युद्ध होईल. आमच्यावर हल्ला केला म्हणून बदल्यात आम्ही हल्ला केला असे जगाला सांगून पुन्हा पॅलेस्टाइन गिळंकृत करायचा. सिक्स डे वार नंतर जेव्हा पूर्व जेरुसलम इस्त्रायल ने ताब्यात घेतलं तो दिवस जेरुसलम दिवस म्हणून इस्राएल साजरा करते. हा दिवस साजरा करताना ओल्ड सिटीमध्ये असलेल्या अरब वस्तीतून मुद्दाम मोर्चे काढले जातात , जेणे करून पॅलेस्टाइनने उठाव करावा. संयुक्त राष्ट्राने पॅलेस्टाईन तुकड्यात वाटला होता. जेरुसलम हे वेस्ट बँक नामक तुकड्यात येते. पॅलेस्टाईनचा एक तुकडा गाझा पट्टी आहे. या गाझा पट्टीत हमास नावाची आतंकी संघटना काम करते. याला अर्थात इराणची फुस आहे. हमासने इस्राएल वर तोफांचा मारा केला. बदल्यात युद्ध पेटले. मी हे लिहीत आहे तोपर्यंत मृतांचा आकडा १२० पर्यंत पोहचला असून यात ३० निष्पाप मुल आहेत. आधीच अस्तित्व गमावत चाललेला पॅलेस्टाइन दोन गटात अजून विभाजित आहे. वेस्ट बँक वर पॅलेस्टाइन अथॉरिटी ( पी ए ) जे लोकशाही संघटन आहे ते काम करते तर गाझा पट्टी वर हमास हे अतेरेकी संघटन काम करत असते. वेस्ट बँकने नेहमी आपल्या बाबी लोकशाही मार्गाने इस्राएल पुढें मांडल्या आहेत. गाझा पट्टीवर हमासचा दबदबा आहे. हे युद्ध हमास विरुद्ध इस्राएल आहे असे म्हणले तरी वावगे ठरणार नाही, कारण पॅलेस्टाइन उरलाच कुठे आहे. 

आंतराष्ट्रीय दबाव कुणावर आहे? दुनिया कुणासोबत उभी आहे? ही लढाई आंतराष्ट्रीय स्तरावर विचारधारेची लढाई होऊन जाते. प्रत्येक देश आपल्या संधीनुसार या युद्धाकडे पाहताना दिसतो. संयुक्त राष्ट्र हा वाद मिटवू शकले नाही. म्हणवले जाणारे प्रगत देश यावर आपली भूमिका स्पष्ट करताना दिसत नाहीत. मानवतेच्या वर स्वार्थ बसला आहे. संयुक्त राष्ट्राची सुरक्षा परिषद रविवारी यासंधर्भात भेटणार आहे. तोपर्यंत अजून किती निष्पाप जीव जातील याची गिनती कोण करणार आहे? अमेरिका अप्रत्यक्षपणे इस्रायलच्या पाठीशी उभी राहताना दिसत आहे.
बिडेन अध्यक्ष झाले तेव्हा मानवतावाद जागतिक स्तरावर उचलून धरण्यासाठी ते कटीबद्द होते. 
बिडेन यांची ही परीक्षा आहे हे मात्र नक्की.


असंख्य पदर आहेत , सारे इथे मांडणे अशक्य आहे मात्र एक गोष्ट अजून इथे नमूद केल्याशिवाय हा प्रपंच पुरा होणार नाही. शेख जराह संघर्ष. शेख जराह ही जमीन ज्यू लोकांनी अरब लोकांकडून खरेदी केली होती. १९४८ मधील अरब इस्राएल युद्धात पूर्व जेरुसलमवर जॉर्डनने कब्जा केला. जॉर्डनने ज्यू लोकांवर अत्याचार केले. पॅलेस्टाईन अश्रयार्थी तिथे स्थाईक झाले. दरम्यान शेख जराहची मालकी ज्यू लोकांचीच राहिली. आता तिथे संघर्ष ज्यू विरुद्ध मुस्लिम असा काहीसा पेटला आहे. निर्विवाद मालकी ज्यू लोकांची आहे पण मग अर्ध दशक तिथे राहत असलेल्या २८ कुटुंबांनी जायचं तरी कुठे आणि ही २८ कुटुंबे हाकलून दिल्यावर एकामागून एक हळू हळू रांग लागणार हे इस्राएलच्या विस्तारवादी इतिहासाला पाहून नाकारता येत नाही.बरेच काही अजून लिहिता येवू शकत होते, शेवटी शेकडो वर्षांचे रक्ताने माखलेले नाटक इतक्या सीमितपणे मांडणे अशक्य आहे. 


कोण चूक आणि कोण बरोबर हा इतिहास ठरवत असतो. 
माझी भूमिका पॅलेस्टाइन सोबत आहे , मात्र मी हमासचे समर्थन करत नाही. माझी भूमिका इस्राएल सोबत आहे मात्र त्या इस्राएल सोबत जे संयुक्त राष्ट्राने दिले होते. विस्तारवादी राक्षसांनी गिळंकृत केलेल्या आताच्या इजराइल सोबत नाही. प्रश्न अत्याचाराचा आहे आणि जिथे जिथे अत्याचार होतो तिथे तिथे अल्पसंख्यांक हे बळी ठरत असतात. खरे साहस पीडित समुदयासोबत उभे राहण्यात असते. अन्याय पाहुनी तुमचे रक्त पेटून उठले पाहिजे, माणूस असण्याचा तो फार मोठा पुरावा आहे.


यहुदी कट्टरपंथी आणि मुस्लिम कट्टरपंथी हे दोन्ही राक्षस भिडून संपून जावे ही जरी आस असली तरी हे दोघेही राहणार आणि मृत पावणार दोन्हीकडील निष्पाप जीव. 
सरतेशेवटी काहीच उरणार नाही. कुणी किती बाजीरावकी केली आणि कुठपर्यंत केली. उरेल फक्त निष्पाप लोकांवर केलेले अत्याचाराचे पातक. ज्याची शिक्षा इतिहास देत असतो. दोन्ही बाजूचे आपले आपले प्रियजन गमावतील. धार्मिक अहंकार मानवतेच्या उरावर बसून दात काढतील. एक काळ होता हिटलरने यहुदी लोकांशी हे केले आज यहुदी तेच पॅलेस्टाइन सोबत करत आहेत. मृत पावलेले स्वर्गातून हा नरसंहार पाहत असतील. मित्रा , मार्क्स बरोबर होता - धर्म ही सामान्यांना दिली जाणारी अफूची गोळी आहे.


बाकी इथे तरी आपण भारतीय कुठे आणि कसे कमी पडू. आपण देखील या युद्धात सोशल मीडियाद्वारे उडी घेतली आहे. आपल्याला बाजु निवडणे खूप सोपे आहे. युद्धात असलेल्या देशाचा धर्म बघा आणि विरोध अथवा समर्थन करा. आपल्याला न्याय अन्याय वगैरेची काही पडली नाही.
असो मित्रा, एकच सांगणे आहे पॅलेस्टाईन किंवा इस्राएल सोबत उभा राहण्यासाठी जाशील तेव्हा जाता जाता बिहार आणि उत्तरप्रदेश वरून जा. जरा गंगेच्या किनाऱ्यावर बस. तिथे आजकाल मृतदेह वाहत येतात. मृतदेह, सरकारच्या हतबलतेचे , डुंबत चाललेल्या अर्थव्यवस्थेचे, अराजकतेचे, धार्मिक द्वेषाचे. आधी त्या मृतदेहासोबत उभा राहा. आधी भारत नावाच्या विचारासोबत उभे रहा. बाकी जगाची धूनी नंतर धुता येतील.

शांती ! शांती ! शांती !

- केतन गजानन शिंदे ( राजन )


 

Comments

Post a Comment