इतिहासाची पुनरावृत्ती होते याचे कारण इतिहास वाचला जातो त्यातून धडे गिरवले जात नाहीत. धडे गिरवले जात नाहीत कारण काळ बदलतो मात्र समाजाची मानसशास्त्रीय जडणघडण प्रागतिक पथावर मार्गक्रमण करत नाही. कदाचित ती हेतूपरस्पर रोखली देखील जात असावी. समाज नेते घडवतो. नेते जगाचा नकाशा ओरबाडू लागतात. समाज भरडला जातो. इतिहास पुनरावृत्ती करत राहतो.
अल्बर्ट आईन्स्टाईन लिहतात -
"मला माहित नाही तिसरे महायुद्ध कुठल्या शस्त्रांनी लढले जाणार आहे पण चौथे महायुद्ध काठ्या अन् दगडाने लढले जाईल"
आंतरराष्ट्रीय भौगोलिक राजकारणाची सध्य स्थिती भयावह आहे. युक्रेन रशियाच्या पलीकडे जाऊन आंतरराष्ट्रीय सिव्हिल सोसायटी याकडे वेगळ्या दृष्टीने पाहत आहे. ग्लोबल विलेज वगैरे म्हणून नावारूपाला आलेल्या जगात हे होणे रास्त आहे.
आंतरराष्ट्रीय राजकारण ही अनुमान न लावता येणारी गोष्ट आहे. हल्लीच्या काळात त्याचा सबंध रोख इंडो पॅसिफिक वर होता. चीन विरुद्ध अमेरिका हेच काय ते समीकरण उरले होते. ट्रेड वार म्हणजेच आधुनिक कोल्ड वार आहे असे तज्ञ म्हणत असताना एकाएकी फासे पालटत जातात. आज रशिया उभा आहे, आपली मक्तेदारी स्थापन करायला. हा डाव मात्र रशियाच्या अंगलट येण्याची शक्यता जास्त आहे.
या एकूण परिस्थितीची पार्श्वभूमी काय आहे? ते मांडणे इतके सोपे नाही. हा कलह, ही कुचंबणा, हा रक्तपात, हा विद्रोह ही जटील राजकीय आणि सामाजिक घटनांची देण आहे.
पहिले विश्व युद्ध झाल्यावर ज्या परिस्थितीने जर्मनी ढासळली. ज्या पद्धतीने व्हर्साय मध्ये जर्मनीचा खुळखुळा केला त्याच पार्श्वभूमीवर १९९१ मध्ये रशिया उभा होता. ज्या पद्धतीने हिटलर ' लॉस्ट ग्लोरी ' मिळवण्यासाठी उभा राहिला आणि राष्ट्राचे पतन करून गेला त्याच भूमिकेवर आज पुतीन उभा आहे. याची सुरुवात आज सुरू झाली नाही. जॉर्जिया २००८, क्रीमीया २०१४ आणि आता युक्रेन. पुतीन यांनी पावले सावधपणे एक एक करून पुढे पडत आलीच आहेत. युक्रेनचा हिस्सा असलेला क्रिमीया जेव्हा पुतीन यांनी हस्तगत केला तेव्हा जग हातावर हात ठेऊनच होते. किंबहुना ते आजही तसेच आहे. प्रश्न हा आहे की रुल बेसड ग्लोबल ऑर्डर, जी निव्वळ कागदावर तरी अस्तित्वात आहे अशी शास्वती असणाऱ्या जगाला आता आपल्या असुरक्षतेचा फेरविचार करणे गरजेचे झाले आहे.
अवघे अफगाण राष्ट्र तालिबान सारख्या अतिरेकी संघटनेच्या हाती गेले. अमेरिकेने हात झटकले. आज तिथे पोर भुकेने मरत आहेत. आपल्याला त्याचा फरक कितीसा पडतो आहे? आपण युक्रेन देखील विसरणार आहोतच. 'बीग स्टिक' घेऊन फिरणारे देश शोषण करत राहतील. निष्पाप पोर जगाला आणि जगण्याला मुकणार आहेत. गरोदर स्त्रियांचे खून होणार आहेत. आबालवृद्धांना गोळ्या घातल्या जाणार आहेत. यालाच यांची वैश्विक सभ्यता म्हणावे. हीच ती परिभाषा.
रशियन साम्राज्य हे जगातले तिसरे मोठे साम्राज्य होते. जेव्हा रशियन राज्यक्रांती झाली तेव्हा झार राजाचे शासन होते. बोल्शेविक क्रांती झाल्यावर लेनिन सत्तेत आला. रशिया हे संघराज्य असावे अशी लेनिनची विचारधारा होती. पुतीन यांनी यावरून लेनिन यांनाच बोल लावले. यातून हे अधोरेखित होते की पुतीन यांना झार साम्राज्य जिथपर्यंत होते ते आपलेच आहे असे वाटू लागले आहे. हा मूलभूत वेडेपणा आहे. राष्ट्र ही संकल्पना एकोणिसाव्या आणि विसाव्या शतकात उदयाला आली. त्याआधी साम्राज्ये होती, सिटी स्टेटस होत्या. अमूक माणसे माझी भाषा बोलतात, एकेकाळी माझ्या साम्राज्यात होती म्हणजे मी तिथला स्वामी आहे ही कल्पना मूर्ख आहे. आजची राष्ट्र बरेच समुद्रमंथन होऊनी घडली आहेत. थोडक्यात पाकिस्तान किंवा बांगलादेश ही आताची राष्ट्रे. यावर भारत आपली मक्तेदारी आज स्थापन करू शकतो का? तसेच उद्या चीनला वाटेल अरुणाचल माझा आहे तर ते होऊ शकते का? थोडक्यात सार्वभौम हाच आधुनिक रूल बेसड ऑर्डरचा (मग ते कागदावर तरी असेना का) पाया आहे.
पश्चिमी देशांनी स्थापन केलेल्या नॉर्थ अटलांटिक ट्रिटी ऑर्गनायजेशनने (नाटो)अलीकडच्या काळात युरोपात हात पाय पसरले. नाटोवर अमेरिकेची मक्तेदारी आहे. युरोप आपल्या अधिपत्याखाली रहावा म्हणून अमेरिकेने सुरुवातीपासूनच प्रयत्न केले आहेत. रशियाचे विघटन झाल्यावर अमेरिकी मक्तेदारी स्थापन झाली. युक्रेन जर नाटोचा हिस्सा झाला तर नाटो रशियाचे दरवाजे ठोठवेल ही रशियाची भीती ग्राह्य असली तरीही ज्या पद्धतीने सार्वभौम देशाला रशिया वेठीस धरू पाहते आहे, पण तो देश झुकत नाही, एकाकी पडून लढतो आहे हे चित्र इथून पुढच्या जागतिक राजकारणासाठी महत्त्वाचं ठरणार आहे.
हा विषय एका लेखात मांडणे अशक्य आहे. आज युद्धावर भाष्य करणे हा माझा हेतू नाही. तो विषय वृत्तपत्रात, दूरदर्शन, सोशल मीडियावर आहे. त्याचे जगावर आणि भारतावर पडणारे फटके, तेलाच्या वाढणाऱ्या किंमती, (निवडणूक झाल्यावर!) भारताची बाजू, आपले रशिया संबंध वगैरे सार काही बोललं जात आहे, लिहले जात आहे. आजचा विषय भारताच्या त्या विद्यार्थ्यांसाठी आहे जे या युद्धात कॉलेटरल शिकार होत आहेत.
ऑपरेशन गंगा!
युक्रेन मधून विद्यार्थी आणि लोकांना भारतात माघारी आणण्यासाठी ऑपरेशन गंगा सुरू झाले. हा नवीन भारत आहेत, इथे मीम्स बातम्या होतात आणि बातम्या सरकारचा प्रोपोगोंडा. बंद असलेल्या एअरस्पेस मधून कशाप्रकारे भारतीय विमान गेले, सहा तास रूस ने भारताच्या सांगण्यावरून युद्ध थांबवले आणि कशाप्रकारे मोदी है तो मुमकिन है चा नारा दिला आणि या देशाने तो स्वीकारला यावर पराकोटीचा खेद होतो. मीडिया ज्या रसातळाला पोहचली आहे तिचा किळस येतोय. अशा परिस्थिती मध्ये देखील मीडिया 'मोडीया ' म्हणून वावरत आहे. हा देश म्हणून आपला पराजय आहे. ज्या ऑपरेशन गंगा ची माहिती दिली जात आहे ते २६ फेब्रुवारी रोजी सुरू झाल आहे. २४ तारखेला युद्ध सुरू झाले होते. फेब्रुवारी मध्ये युद्ध होणार हे सूर्यप्रकाशाइतके स्पष्ट होते. २६ फेब्रुवारी पूर्वी जे विद्यार्थी आले त्यांनी १ लाखापर्यंत तिकिटाचे पैसे भरले आहेत. हा आहे नवा भारत. सुरुवातीला २,००० विध्यार्थी आणल्याने तुम्ही नाचू लागता? मीडिया नाचू लागते? बाकीच्या विध्यार्थी अन् नागरिकांच्या आक्रोशाचे काय ? बाकीच्या देशांची राजदूतावास खुली आहेत. आपलेच विद्यार्थी मग का पोहचू शकत नसतील? चार चार मंत्री लाऊन देखील तुम्ही किती जणांशी संवाद साधू शकला आहात? सोशल मीडियाच्या जमान्यात काही लपत नाही. तुम्ही आणि ती बेगडी, मीडिया कितीही ताकत लावा, सत्य बाहेर येतंय, पोर ओरडत आहेत, पोर भुकेली आहेत, तहानलेली आहेत आणि ते दुर्दैवी व्हिडिओ तुम्हालाच नव्हे तर भारताला जगाच्या पाठीवर उघड पाडत आहेत. हे आहे राष्ट्रवाद्यांचे सरकार ?
बऱ्याच प्रेशर नंतर शेवटी ऑपरेशन गंगा मार्गावर येताना दिसते आहे. अजूनी रस्ता लांबचा आहे. भारतीय वायू सेनेची हवाई जहाजे पाठवली. आजही कीव, खार्किव, सुमी विश्वविद्यालयाच्या आवारात भारतीय विद्यार्थ्यांचा आणि नागरिकांचा आक्रोश घुमतो आहे. सुमी विश्वविद्यालयाच्या आवारात नुसते विद्यार्थीच ८०० आहेत. हा भाग पूर्व युक्रेनच्या भागात येतो. सरकार म्हणते आहे की तुम्ही सीमेवर या. आम्ही तुम्हाला तिथून घेऊन जाऊ. कुठल्या सीमेवर? तर पोलंड, हंगेरी, रोमानिया वगैरे वगैरे देशांच्या. थोडक्यात तुम्ही ओरिसाच्या भागात अडकले आहात आणि सरकार म्हणत आहे की मुंबईला या, आम्ही तिथून तुम्हाला घेऊन जाऊ. रणांगणात मिसाईल कोसळत आहेत, गोळ्या झाडल्या जात आहेत. अशात विद्यार्थ्यांनी कसे आणि कुठे जावे हा प्रश्न आहे? एका विद्यार्थ्याने उपस्थित केलेला एक प्रश्न इथे महत्त्वाचा ठरतो. "सरकार कुठले स्थलांतर करत आहे, जिथे युद्ध नाही तिथे सरकार आम्हाला बोलवत आहे आणि तिथून आम्हाला मायदेशी आणते आहे. याला स्थलांतर म्हणता येईल?" हा प्रश्न रास्त आहे.
भाजपचे अनिल बुलानी यांनी एक लेख कमी स्तुतीपत्र अधिक लिहून या सरकारची बेशरमी स्पष्ट केली आहे. म्हणजे एकीकडे विद्यार्थी आणि नागरिक जीव मुठीत धरून बसले असताना इकडे यांना नमो नमो करण्याचे सुचते कसे? तुमच्याकडे ब्ल्यु प्रिंट काय आहे? तुमचा प्लॅन ऑफ एव्ह्यक्यूशन काय आहे? हे स्पष्टपणे मांडा. याला सरकारची बाजू मांडणे म्हणले जाईल मात्र अनिल बुलानी लिहतात की कशाप्रकारे मोदी यांनी अशा संघर्षाचा काळात भारतात सुखरूप परत आणले आहे. अफगाणिस्तान, अमेरिका अमुक तमुक ठिकाणचे पूर्वीचे दाखले देत राहताना आताच काय यावर त्यांची लेखणी शांत राहते. अनिल बुलानी यांना राज्यसभा वगैरे हवी असल्यास गोष्ट वेगळी आहे. यांना लाज वाटली पाहिजे. वंदे भारत वेळी कोरोनाच्या काळात देखील किती लूट केली त्याचा आकडा काढला तर यांच्या जिभा बाहेर येतील. बाकी परदेशात वास्तव्य करणारे भारतीय संकटाच्या काळात देशात सुखरूप परत आणणे हे सरकारचे कर्तव्य आहे. पण क्रेडिट महत्वाच आहे. क्रेडिट शिवाय डोलारा उभा करता येणार नाही. डोलारा नाही तर मत नाही. मत नाही तर सत्ता नाही.
यातूनच एक स्वंतत्र विषय बाहेर येतो. ही पोर बाहेर का जात आहेत? संस्थात्मक पातळीवर या देशाच्या शैक्षणिक पटलावर काही उरलेच नाही. भारतात खाजगी विद्यालयातून डॉक्टरी करण्यासाठी सुमारे १ करोड रुपये लागतात. याच्याहून शरमेची गोष्ट काय असेल? १ करोड म्हणजे मध्यमवर्गीय कुटुंबाचे आयुष्य असते. १ करोड म्हणजे गहाण ठेवलेली जमीन असते. १ करोड म्हणजे घेतलेला फास असतो. मागच्या पाच वर्षात वैद्यकीय क्षेत्रात 30,000 जागा वाढून देखील परदेशात वैद्यकीय शिक्षण घेतलेल्या विद्यार्थ्यांना भारतात मेडिसीन प्रॅक्टीस करण्यासाठी घेतलेल्या परीक्षेत 3 पटीने वाढ झाली आहे. वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन नुसार भारतात डॉक्टरांची संख्या कमी असताना देखील ही स्थिती आहे आणि याला कुणी जागतिक संस्थेने हे सांगण्याची गरज नाही, सभोवताली वैद्यकीय संस्थांची ज्या प्रमाणावर कमी जाणवते तोच आरसा आहे. कोरोनाने हे अधोरेखित केलेच आहे. प्रश्न अजून एक आहे. जे विद्यार्थी आता माघारी येत आहेत ते पुन्हा माघारी जाण्याची शास्वती नजीकच्या काळात तर दिसत नाही.अशा विद्यार्थ्यांचे भविष्य काय? त्यांचे शैक्षणिक भवितव्य काय? असे रोज लाखो विद्यार्थी परीक्षांच्या जाळ्यातून बाहेर फेकले जात आहेत. यूपीएससी, नीट, जेईई सारख्या परीक्षांत सारेच उत्तीर्ण होणार नाहीत. उरलेल्या विद्यार्थ्यांनी काय करावे? नवीन संधी कुठे आहेत? पुढच्या पिढ्या कुठल्या दगडावर डोके आपटणार आहेत? सरकारने या ठिकाणी तो दगड तरी शिल्लक ठेवणे गरजेचे आहे. एकंदरीत सगळच मोडकळीस आले आहे. हा देश प्रामुख्याने सत्तकारणाचा विषय होऊनी राहिला आहे. प्रधानमंत्री (वाचा: प्रचारमंत्री) बनारस मध्ये बुथ मॅनेजमेंट करत आहेत. उत्तरप्रदेश हातातून सरकत आहे ही कल्पना त्यांना आहे. ध्रुवीकरण होईना झालंय. हे बिथरले आहेत. हा देश फक्त राजकीय सत्ता मिळवणे आणि ती टिकवणे इथपर्यंतच मर्यादित राहिला आहे. वेल्फेअर स्टेट वगैरे काही उरलं नाही. सत्ता हीच विचारधारा झाली आहे. धार्मिक राष्ट्रवादाचा बुरखा घालून हे देशाचे पतन करत आहेत. येणारा काळ हे अधिक स्पष्ट करेल.
या दळभद्री परिस्थितीत देखील हतबल होण्याचे काही एक कारण नाही. आपल्या आपल्या परीने या गोष्टींवर विचार करायला आणि या गोष्टी आपण समजायला जरी सुरू केले तरी योग्य दिशेने पाऊल पडू शकते. प्रश्न आहे की आपल्याला ही राजकीय समीकरणे समजून घ्यायची आहेत का?
डेव्हिड विरूद्ध गोलिथ ही एक कथा आहे . डेव्हिड सामर्थ्यशाली योद्धा होता. गोलीथ हे मेंढपाळ पोरगं होत. डेव्हिड विरुद्ध लढण्याचा कुणाचा धडा होईना. त्याच्या जाचाला सारे कंटाळले होते. गोलीथ त्याच्याशी लढतो. एका दगडात डेव्हिड मृत पावतो. गोलीथला विचारतात की बाबा तू हे असे कसे करू शकला? गोलीथ म्हणतो की माझ्यासोबत माझा देव होता. युक्रेन सोबत आज देव आहे का? कदाचित त्याच्या सोबत आज कुणीच नाही. हे जागतिक शिष्टाचार शिकवणारे अमेरिका आणि पश्चात देश हातावर जात ठेऊन तमाशा बघत आहेत पण तो देश लढतो आहे. डेव्हिड आधीच हरला आहे, किंबहुना तो जिंकेल देखील पण आजचा गोलीथ जगाला नव्याने धडा देत आहे! आपण यात कुठे आहे हा प्रश्नच येत नाही, आपण याचा आधीच हिस्सा आहोत. शोषितांच्या संवेदना वाटून घ्यायला आंतरराष्ट्रीय समाजाचा एक हिस्सा म्हणून तुम्ही आम्ही शिकले पाहिजेच. पक्ष, विचारधारा वगैरेचा अडथळा वैयक्तिक मला तरी कधी आला नाही. शोषितांच्या आणि शोषकांच्या लढाईत, शोषितांच्या खांद्याला खांदा लावावा. माणूस म्हणून जगण्याचा तो ठळक पुरावा असतो. देश म्हणून आपली डिप्लोमसी वगैरे ती एक बाजू आहे. ते देश म्हणून आपण निभावत आहोतच पण याच्या पल्याडच, क्षितिजाला परे असणारे चित्र पाहा. नुकतीच जन्मलेली लेकर, बारुदांचा आवाज ऐकत आहेत. या उमललेल्या फुलांशी, निष्पाप जीवांशी आपल्या भावना राहू द्या! आजही जग अस्तित्वात आहे ही ताकद प्रार्थनेची आहे.
प्रार्थना जगाला तारेल, माणुसकीच्या कविता तारतील.
तिरस्काराचा काळ आहे, असू द्या! प्रेमच क्रांती आहे!
- केतन गजानन शिंदे (राजन)
Excellent ketan good job
ReplyDeleteVery nice ...keep it up
ReplyDeleteVery nice keep it up
ReplyDeleteNice.
ReplyDelete