ही पहाट देखणी आहे. आजचा पूर्व क्षितीजावर उगवणारा भास्कर हा 'महाराष्ट्र' तेजाचे जाज्वल्य दर्शन घडवणारा आहे. हा भास्कर उधळत आहे तो लाल रंग म्हणजे रक्त आहे. १०६ वंदनीय हुतात्म्यांचा रक्ताचा शेवटचा थेंब त्यात सामावला आहे. हा धर्म महाराष्ट्र आहे आणि ही अस्मिता मराठीच आहे. ही प्रखर जाणीव म्हणजेच भविष्याचा गर्भ आहे.
छत्रपती शिवाजी महाराजांनी या जगताच्या पाठीवर सरंजामशाही डावलत एक लोककल्याणकारी असे रयतेचे राज्य उभा केलेला हा महाराष्ट्र! महात्मा ज्योतिबा फुले, राजर्षी शाहू महाराज आणि विश्वरत्न बाबासाहेब भीमराव आंबेडकरांनी सामाजिक क्रांती घडवून आणून एक देखणे भविष्य घडवलेला हा महाराष्ट्र! ही भूमी शौऱ्याची, धैर्याची, महाप्रतापी महानेत्यांची, आंदोलनाची, अविरत संघर्षाची, संताची, संयमाची, संस्कृतीची , लढावू बाण्याच्या शिलेदारांची, दिल्लीचे तख्त राखणाऱ्यांची आणि त्यापुढे कधी न झुकणाऱ्यांची सुद्धा!
दिल्ली दरबारी मुजरे करणारे तत्कालीन काँग्रेस नेते जेव्हा आपली लेचीपीची भूमिका सांभाळण्याचा प्रयत्न करत होते तेव्हा या भूमीच्या साहित्यिकांनी ही धुरा आपल्या हातात घेतली आणि त्यातून संयुक्त महाराष्ट्र चळवळ जन्माला आली. शाहीर अमर शेख खेड्यापाड्यात जाऊन मराठी अस्मितेचे पोवाडे गात राहिले. हा क्रांतीचा सर्वोत्तम आविष्कार होता. कॉम्रेड श्रीपाद डांगे, एस एम जोशी, आचार्य अत्रे, विश्वरत्न बाबासाहेब भीमराव आंबेडकर, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे, प्रबोधनकार ठाकरे, सेनापती बापट आदींच्या नेतृत्वात उभे राहिलेले हे जनआंदोलन हे आपल्या दैदिप्यमान इतिहासातले अनेकांपैकी एक असलेले सुवर्ण पान आहे.
आज यातल्या काही बाबींचा प्रकर्षाने आढावा घेणे गरजेचे आहे. हा आढावा फक्त इतिहासाचा दस्तऐवज म्हणून न घेता त्यातून वर्तमानात गिरवायचे असलेले धडे आणि भविष्याची त्यातून खुली होणारी वाट या दोन्ही गोष्टी प्रकर्षाने पाहण्याचा प्रयत्न झाला पाहिजे.
१९४६ च्या साहित्य संमेलनातून संयुक्त महाराष्ट्र चळवळ अस्तित्त्वात आली. राजकीय नेते या चळवळीत नंतर सामावले गेले. एका चळवळीचा उगम हा साहित्यिक पार्श्वभूमी लाभलेला असू शकतो आणि त्यातून प्रचंड पातळीवर देशाच्या राजकारणात उलथापालथ होऊ शकते हे संयुक्त महाराष्ट्र चळवळीने सिद्ध केले आहे आणि आज तो धडा प्रामुख्याने गिरवणे महत्त्वाचे आहे. साहित्य म्हणजे समाजाचा दर्पण! राजकारण हा सामजाचा प्रामुख्याने हिस्सा असताना साहित्य आणि राजकारण हे अलिप्त कसे राहू शकते हा प्रश्न आज काही प्रकांड पंडितांना विचारणे म्हणून गरजेचे होते. साहित्याने राजकारण फैलावर धरायला हवेच. आज एकामागून एक छोटी मोठी साहित्य संमेलने होत असताना किती साहित्य संमेलने देशात उभ्या ठाकलेल्या राजकारणाचा मागोसा घेऊ पाहतात हा प्रश्न आहे. किती नवे निर्माण होणारे साहित्य राजकीय सामाजिक गोष्टींची वाच्यता करते आहे? साहित्य संमेलनात होणारे परिसंवाद, चर्चासत्र किंवा कवी संमेलनात काय विचार मांडले जात आहेत?
साहित्य हे आंदोलन आहे ही गोष्ट म्हणून ठळकपणे मांडली गेली पाहिजे. ती गोष्ट जगली पाहिजे!
भाषेच्या आधारावर राज्ये निर्माण करण्यावर नेहरूंचा संभ्रम होता. स्वतंत्र भारताच्या पहाटे धार्मिक दंगलीचा डोंब उसळला होता. यातून देशाची एकसंघ एकात्मता टिकून राहावी म्हणून भाषिक आधारावर राज्ये नको ही नेहरूंची प्रतिगामी भूमिका त्यांच्या दृष्टीने जरी ग्राह्य धरली तरी देखील या भूमीचे नाडे ओळखायला नेहरूंना उशीरच झाला. भाषिक आधारावर राज्ये निर्माण होऊन आज कैक दशके लोटल्यावर आणि भारत एकसंघ उभा राहिल्यावर, भाषिक आधारावर राज्ये निर्माण करणे हे रास्तच होते हे सिद्ध झाले आहे आणि याला आता इतिहासाचा दाखला आहे.
स्वतंत्र भारतात महाराष्ट्र भूमीवर कैक प्रयोग करण्यात आले. त्रिराज्य योजना, धार कमिशन, जेव्हीपी कमिटी, फाजल अली कमिशन किंवा मग त्यात द्विभाषिक राज्याचा केलेला प्रयोग असो. मुंबई कुणाची? विदर्भ कुठे जाणार? मराठवाड्याचे काय? गोव्याचे काय? बेळगाव-कारवारचे काय? असे तमाम प्रश्न राजकारणात फिरत असताना चळवळ मराठी भाषिकांच्या मुद्द्यावर ठाम राहिली आणि त्याची परिणीती म्हणजे हा आजचा महाराष्ट्र आहे! यावर गुंफलेले राजकारण हे काँग्रेस पक्षाला अनुकूल होऊ लागले असताना १९५७ सालच्या निवडणुकीत काँग्रेसला काठावर बहुमत मिळाले. शिवाय संयुक्त महाराष्ट्र चळवळ विरोधी पक्षाच्या भूमिकेत जाऊन बसली. राजकीय गणिते अंगलट येऊ लागली की भूमिका बदलतात. याला नेहरू अपवाद नव्हते आणि नेहरूंनी याचा गांभीर्याने विचार करायला सुरुवात केला. या निवडणुकीत जनतेने शिकवलेला धडा हा आंदोलनाचा महत्त्वाचा टप्पा होता. संयुक्त महाराष्ट्र चळवळीने सबंध इतिहासाचे वारे बदलून टाकले. या चळवळीच्या उदरातून आजचा महाराष्ट्र आणि आपण जन्मलो आहोत ही जाणीव असणे म्हणून महत्त्वाचे आहे.
उभी भांडवलशाही आणि मोरारजी देसाई आणि इतर काँगेस नेतृत्व एकत्रितपणे मुंबई गुजरातची व्हावी म्हणून झटत होते. मुंबईचा प्रश्न म्हणून राजकीय नसून अधिक आर्थिक होता. क्रोनी केपिटलिजम पद्धतशीर जाळे पसरून होते. यावर युक्तिवाद असा होता की मुंबई गुजराती भांडवलदारांनी उभी केली आहे. अरे कुठल्या गुजरात्यांनी मुंबई उभा केली? इथे हे ध्यानात घेतले पाहिजे की तिथला कामगार, कष्टकरी हा मराठीच होता. उभे राहिलेले उद्योग, सूतगिरणी हे इथल्या मराठी लोकांच्या रक्तावर उभे राहिले होते. आमच्या रक्तावर महल बांधून त्यात झोपा काढण्याची स्वप्ने रंगवणार असला तर याद राखा हा संदेश स्पष्ट होता. चळवळ तसूभर देखील ढळली नाही आणि मुंबई कुणाची तर ती फक्त महाराष्ट्राचीच ही घोषणा युद्धाची ललकार झाली. काँग्रेस नेते स का पाटील आणि मोरारजी देसाई यांनी चौपाटीवर घेतलेली सभा म्हणजे यांच्या उतावळ्या भूमिकेची परिणीती होती. चंद्र तारे असेपर्यंत, इथून पाच हजार वर्षे लोटली तरी महाराष्ट्राला मुंबई मिळणार नाही ही मजल स का पाटलांनी गाठली. पुढे पाच वर्षातच महाराष्ट्राचा जन्म झाला हा इतिहास आहे. शिवाय जॉर्ज फर्नांडिस यांनी स का पाटील यांना पुढे खासदारकीला धूळ चारली हा देखील इतिहास आहे.
चळवळ जर प्रामाणिक असेल, तिच्या पुढे जर वस्तुनिष्ठ उद्दिष्ट असेल तर त्याचे जनआंदोलन होते. त्यात स्त्री पुरुष, वृध्द अबाल सारेच ओढले जातात. एक रण तयार होते आणि इतिहास बदलला जाऊ शकतो हे जगाच्या आणि भारताच्या इतिहासात अनेकदा स्पष्ट झाले आहे. संयुक्त महाराष्ट्र चळवळ म्हणून जगातल्या महान चळवळीत सामील आहे. ही ताकत आपल्याला आपल्या इतिहासाने बहाल केली आहे. वर्तमान आणि भविष्याची कवाडे इथूनच खुली होतात. ही जाणीव आपल्या धमन्यात वाहते आहे तोवर महाराष्ट्र जिवंत आहे!
आज लोकशाहीच्या तमाम संस्था सत्तेच्या अधीन झाल्या आहेत. सर्वांचा वापर एका व्यापक प्रमाणावर सोशल इंजिनियरिंग करण्यासाठी होत आहे. आपली राजकीय झापडे बाजूला सारल्यास याची स्पष्टता सहज शक्य आहे. आपल्याला पैलतीरावर काय घडते आहे याची मागमूस नाही. हिंदी लादली जाऊ लागली आहे. एक पक्ष, एक नेता, एक धर्म, एक भाषा, या अमुक 'एक एक' करण्याचे डोहाळे भाजपप्रणित राजकारणाला लागले आहेत. ज्यांना भारताचा अभ्यास आहे त्यांना विविधता कळते. जे विविधता अबाधित राखतात ते देश अबाधित राखतात. हिंदी भाषा म्हणून अभिमान आहे. तेवढाच अभिमान उर्दू, तमिळ, बंगाली, कन्नड आणि या भारत भूमीवर बोलल्या जाणाऱ्या भाषांचा देखील आहे. मावशी म्हणून आम्ही त्या भाषांना उचित सन्मान देत आलो आहोतच पण जर आमच्या आईला, आमच्याच घरात धक्के देणार असाल तर त्याचे खंडन करण्यात येईल हा संदेश स्पष्ट दिला पाहिजे.
एक मराठी अस्मितेसाठी आपल्या पूर्वजांनी आपले रक्त वाहिले आहे याचा विसर आपल्याला पडायला नको. समाजासाठी भाषा हा संवादाचा आणि म्हणून जगण्याचा मार्ग असतो. ही भाषा जपायला हवीच. त्याचा नव्याने आविष्कार होत रहावा. तो संस्कारात सामील असावा. जागतिकीकरणात गुलामीची सवय नकळत लावली जात आहे आणि म्हणूनच हे आपल्याला लाभलेले ऐतेहासिक बाळकडू आपल्या पिढ्यांना हेतुपूर्वक पाजले पाहिजे. आपली पोर खडाखडा इंग्रजी बोलतात, हिंदी डायलॉग तोंडपाठ करून रील्सवर मिरवतात आणि मराठी स्पष्ट लिहिता सोडा वाचता देखील येत नाही ही जर परिस्थीती असेल तर ही शरमेची गोष्ट आहे. मराठी शाळा जपल्या पाहिजेत. जिल्हा परिषदेच्या शाळा म्हणजे संस्काराची अनुभूती आहे आणि सोबत तो शिक्षणाचा खऱ्या अर्थाने आविष्कार आहे. शिक्षणाचा बाजार केलेल्या संस्था आपल्याला जवळच्या वाटू लागल्यापासून आपण ही अधोगती केली आहे. आपल्या इतिहासाचा हा अपमान आहे. भाषा ही ताकत आहे. त्याचा विसर पडणारे कालांतराने दुबळे होत जातात. सत्ताकारणात भाषा शेवटी मुद्दा आहे ज्यावर यांना यांच्या पोकळ राष्ट्रवादाच्या भाकऱ्या भाजायच्या आहेत. भाषा हा विषय म्हणून अधिक समाजकारणाचा राहायला हवा. ती समाज म्हणून आपली जबाबदारी आहे.
संयुक्त महाराष्ट्र म्हणजे काय? मराठी भाषिकांचे मुंबईसह एकत्रित असलेले भारतीय संघराज्यात असलेले स्थान. आज इतकी वर्षे लोटून गेल्यावर आपण खऱ्या अर्थाने संयुक्त महाराष्ट्र घडवू शकलो आहोत का? पश्चिम महाराष्ट्रात आणि इतर विभागात आढळणारी तफावत म्हणजेच याचे नकारात्मक उत्तर आहे. कोकण, विदर्भ, मराठवाडा, खानदेश यांना आपण खरेच सोबत घेऊन मार्गक्रमण करू शकलो का? हा आजचा महाराष्ट्र संघर्षातून मिळाला आहे. हे आपल्याला आंदण दिले नव्हते. या जाणिवेतूनच पुढचा संघर्ष हा व्यापक आणि समान विकास यावर भर देणारा असला पाहिजे. यासाठी राजकारणाला विकासात्मक दृष्टी हवी. लोकशाहीत राजकारणाला ही दृष्टी आपणच बहाल करत असतो. हे प्रदेश जेव्हा खऱ्या अर्थाने उन्नतीचे शिखर गाठतील तेव्हा १०६ हुतात्म्यांचे बलिदान सार्थकी ठरेल.
आज महाराष्ट्रात उभे असलेले राजकीय वातावरण हे दळभद्री झाले आहे. आपल्या वारसा काय आणि आपण कुठल्या पातळीचे राजकारण करत आहोत हे दुखः कमाल आहे. तो विषय वेगळा आहे आणि आज सणाच्या दिवशी तो मांडणे रास्त नाही. आजही शेतकरी आत्महत्या थांबत नाही. शेतीचे, कामगारांचे, विद्यार्थ्यांचे, कामगारांचे कैक प्रश्न उभे आहेत. तरी देखील आपण हनुमान चालीसा आणि सर्वपक्षीय भोंगे वाजवत फिरत आहोत. एवढे तमाम प्रश्न डोक्यावर असताना आपल्याला कुत्र्याला फेकावे तसे हे तुकडे अधून मधून फेकले जातात. आपणही ते दूरदर्शन लाऊन तासन् तास पाहत बसतोच. आपल्याला या राजकीय गुलामीची सवय झाली आहे. आपण भानावर नाही आहोत!
पुरोगामी हीच आपली ओळख आहे. प्रतिगामी विष हेतुपूर्वक पेरले जात असताना आपला मूलभूत पिंड विसरायला नको. आपल्याला आपले रायगडाचे मंदिर खुणावते का? आपल्याला आपले महापुरुष आणि आपल्या अस्तित्वाला जन्म देणाऱ्या आईसाहेब जिजाऊ, क्रांतिज्योती सावित्रीबाई, पुण्यश्लोक अहिल्यादेवी, माता रमाई आठवतात का?
ही संघर्षाची अन् लढ्याची परंपरा जिवंत राहावी. हा वैचारिक वारसा अबाधित रहावा. निश्चल सह्याद्री सारखा. आपल्यातला शिवबाचा मावळा लढत रहावा. या इतिहासाचे वारसदार असणे ही आपल्यातच एक दिव्य गोष्ट आहे. ती दिव्यता मात्र जपता यायला हवी. आपल्याला आपल्या राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक इतिहासाचा विसर यासाठी नको कारण आपण...
दिल्लीचे ही तख्त राखतो...
जय महाराष्ट्र!!!
- केतन गजानन शिंदे (राजन)
.jpg)

.jpg)
.jpg)
केतन, अतिशय सुंदर लेख लिहिला आहे, अभिनंदन
ReplyDeleteमनःपूर्वक आभार सर...!
Deleteखुप छान
ReplyDeleteमनःपूर्वक आभार सर...!
DeleteAs usual angar rajan
ReplyDeleteधन्यवाद वेदांत...!
Deleteसुंदर लेख आवडला आणि इतिहास उजळला
ReplyDeleteमनःपूर्वक आभार सर....!
ReplyDeleteअप्रतिम.....लिहित रहा
ReplyDeleteमनःपूर्वक आभार ....🙏
Deleteकेतन अप्रतिम अभ्यासपूर्वक लेखन
ReplyDelete