पडद्यामागचे गांजा पुराण




आर्यन खान, समीर वानखेडे, नवाब मलिक यांची वेगळी ओळख देणे आजच्या परिस्थिती मध्ये गरजेचं नाही. सोशल, प्रिंट, डिजिटल, टेलिव्हिजन सारीच्या सारी मीडिया याच्या अवतीभोवती फिरत आहे. ऑक्टोबर तसा गांधींच्या मालकीचा पण तो गांजाच्या मालकीचा झाला. 
ड्राय डे म्हणून गांधी जयंती साजरी करण्यापासून ते 
गांजामय ऑक्टोबर - देश म्हणून आपण अगदीच शिताफीने प्रगती केली आहे.

हे सगळे प्रकरण मी अजिबात ' गलोरीफाय ' करणार नाही. एक तर देश म्हणून ते इथल्या लोकांसाठी अगदीच बिनकामी आहे. दुसरी गोष्ट आर्यन सुटला म्हणून तुम्ही आम्ही सुटत नसतो.

हा झगमगाट केवळ गांजा किंवा रेव्ह पार्टी पुरताच मर्यादित नाही. वातावरणात एक मृगजळ आहे. त्या मृगजळाने मार्केट तयार केले आहे आणि या मार्केटला आजची सोशल मीडियाने मोठ्या प्रमाणावर प्रभावित असलेली तरुणाई बळी पडत चालली आहे. अमूक गोष्टी केल्या नाहीत तर ते सेकंड क्लास आहे अशी धारणा या वातावरणात आहे. चिवट न्यूनगंड झिडकारून देण्याच्या घुसमटीत अशा गोष्टींकडे आकर्षित होणे हे सहज सोपे झाले आहे. कुमार वयात- जेव्हा खर खोटं, चूक बरोबर यात खरी गफलत असते त्याच वयाला हे वातावरण टारगेट करत. याची सुरुवात अगदी नकळत होते. अमूक गोष्ट तथाकथित मॉडर्न भासते आहे म्हणून करायला हवी हे पहिले पाऊल. मग हळूहळू या दुनियेतली एक एक कवाडे खुली होत जातात. मार्केटचा उद्देश सफल होतो आणि तरुणाई बळी पडत जाते. एकामागून एक करत करत ते कल्चर होऊन गेले आहे. या कल्चरला वैचारिक पातळीवर चॅलेंज उभ करण्याची गरज आहे. ते समाज म्हणून आपल्याला करणे इथे जरुरी होऊन जाते.

सुदान किंवा म्यामनार मध्ये मागच्या काही दिवसांत कशाप्रकारे राजकीय उलथापालथ झाली आहे यातून कट्टरवादी आणि सत्तापिपासू वृत्तीचे दर्शन घडते. लोकहो, आपण भारत आहोत आणि आपण तसे असण्यात नशीब आहे. मात्र अशा घटना तुम्हा आम्हाला कट्टरवादी भूमिका घेण्यास पात्र पाडतात. आर्यन का ? सुशांत का ? पुन्हा पुन्हा याला नॅशनल कव्हरेज का ? यात होते असे की तुम्हाला आम्हाला एक स्टँड घ्यायचा असतो. आपण आर्यन सोबत उभे राहतो. आपण वानखेडे सोबत उभे राहतो. आपण मलिक सोबत उभे राहतो. आपल्याला हे कळत नाही की आपण आपल्यासोबत उभे नाही. आपण ११० च पेट्रोल टाकतोय. आपल्या खिशातल्या पैशाची क्रयशक्ती कमी झाली आहे. आपल्याला हाताला रोजगार नाही. आपला बाप तिकडे आंदोलन करतोय. आपण बिनपगारी ट्विटर फेसबुकवर यांच्यासाठी ट्रेंड करतोय. बाकी शिक्षण, वीज, रस्ते अशी यादी करत गेलं तर माणसागणीक समस्या आहेत. ज्याचं उत्तर राजकीय सत्तेत आहे. मात्र हे सगळं विसरून आपण याला बळी पडतो, तेव्हा काहीसा गांजा तुम्हाला आम्हाला देखील दिला असतो.




दरम्यान तुमचे आमचे ध्रुवीकरण होत राहते. तुम्ही आम्ही अजून कट्टर होतो. याची परिणीती उद्याला मतात उतरते. बिहार निवडणूक आणि सुशांत हे छोटे का होईना मात्र समीकरण असते. मग क्रिकेट सामना झाला की त्यातही राजकीय रंग ओतले जातात. धर्म हा भावनिक विषय असल्याने साहजिकच तिथे भावनांचा उद्रेक आहे. हा उद्रेक तुम्ही आम्ही एका स्पिरिट मध्ये दाखवत असताना त्याचा उपयोग राजकीय समीकरणे हाताळण्यासाठी होतो, अर्थात याच केंद्र सत्ताकारण आहे. 

अशा घटना वरवर करमणूक म्हणून आपण घेत असताना नकळत कट्टरवाद भिनवला जातोय. सोशल मीडिया बऱ्यापैकी समाजाच दर्शन घडवत असतो आणि ज्या पद्धतीने आजकाल सोशल मिडियावर तिरस्कार वाहू लागला आहे ही धोक्याची घंटा आहे येत्या लोकशाहीच्या अस्तित्वाची हे समजून घेणे गरजेचे आहे.

आर्यन कडे किती ग्रॅम गांजा मिळाला? त्याची ब्लड टेस्ट केली गेली का? तो भानुशाली भाजपाचा होता का? गोसावी बरोबर की त्याचा अंगरक्षक प्रभाकर बरोबर? शाहरुख कडे १८ कोटी मागून त्यातले ८ कोटी वानखेडे घेणार होते का? कोण कुणाला लाडाने काय म्हणत? कुणाची किती लग्न झाली? कशी झाली? का झाली?  हे प्रश्न आज फाट्यावर मारा. ध्यानात हे घेतलं पाहिजे, असे बळी पडलेले लाखो आर्यन या देशात अस्तित्वात आहेत. म्हणून ब्रॉड पिक्चर ध्यानात घेऊन हे देखील लक्षात घेतलं पाहिजे की अशा लाखोंचे आपण काय करणार आहोत? आर्यन जरा बाजूला सारून अशा बळी पडलेल्या बाकीच्यांना नजरेत घेणे गरजेचे आहे. यांच्याकडे गुन्हेगार म्हणून पाहत बसणार आहोत की अशा बळी पडलेल्या तरुणाईला यातून बाहेर खेचणार आहोत? उद्दिष्ट नक्की काय आहे यावर विचार करायला हवा नाहीतर नशा मुक्त भारत अभियान असो किंवा एनडीपीएस ॲक्ट सुधारून संस्थात्मक बदल करण्याची मनिषा असो, दोन्ही फोल आहे.

तुम्ही आम्ही व्हॉट्सॲप विश्वविद्यालयाची डिग्री घेऊन बसलो आहे. आजकाल कायदा अंमलबजावणी संस्था देखील व्हॉट्सॲपवर पुरावे गोळा करत आहेत. न्यायालय हे मजबूत पुराव्यांवर चालत. तिथं जबाबदारी असते.
मागच्या वर्षी रिहा प्रकरणात न्यायालयाने तेव्हाच एनसीबीच्या कानाखाली लावली होती. मागच्या वर्षातले धडे यांच्या गळी उतरले नसावे. कुलाबाच्या गल्लीत तितक्याच सहजतेने गांजा मिळतो जितक्या सहजतेने पानटपरीवर गायछाप मिळते.गावच्या चावडीवर जितक्या सहजतेने विमल तोंडात भरली जाते तितक्याच सहजतेने तिथे तरुणाई गांजा ओढत असते. एनसीबी तिथवर का पोहचत नाही हा प्रश्न आहे ? थोडक्यात काय तर यंदा देखील तोच मागचा कायास आहे. जनतेला प्रश्नच माहीत नसतील तर विचारतील काय ?
फक्त एनसीबी नव्हे तर इडी, सीबीआय या देखील संस्था आणि त्यांच कामकाज विवादाच्या भोवऱ्यात अडकून राहिल्याने आपोआप त्यांच्याकडे पाहण्याची दृष्टी बदलते. सत्तेकडून यांचा सरेआम वापर होतो आहे यात काही वाद राहिला नाही आणि हा थांबला नाही तर देशपातळीवर असे बिनकामाचे वाद निर्माण केले जात राहतील. त्याला कशाप्रकारे कव्हरेज द्यायचं याचे काम देखील तथाकथित मीडिया प्रामाणिकपणे करत आहे. बेगडी राजकरण आणि त्यातून सत्ताकारण होत राहील आणि शेवटाला सामान्य तोंडघशी पडेल. यात निष्पन्न काही होणार नाही. उद्देश हाच आहे की तुम्हाला आम्हाला प्रश्न पडले नाही पाहिजे. वानखेडे पेट्या गोळा करत राहणार आहेत. जावयावर झालेल्या जखमांना नवाब मलिक यांना भरून काढायचे आहे.
यांची उद्दिष्ट क्लिअर आहेत. आपण गुरफटलेले आहोत.

शिवाय आर्यनचे वय २३ आहे. वय वर्षे २३ म्हणले की त्याचं एक अनन्य महत्व आपसूक या देशाच्या इतिहासात आहे. याच वयात भगत सिंह फासावर गेले होते.

- केतन गजानन शिंदे ( राजन )

#शनिवार_रात_तुमची_आमची_बात 

Comments

  1. राजन आपण अतिशय समर्पक शब्दात आपण आजच्या भरकटलेल्या तरुणाईचे व paid news देणाऱ्या मिडीयाचे चित्र रेखाटले आहे. एक रेख लहान करण्यासाठी दुसरी रेख मुद्दामहून मोठी केली जात आहे. पेट्रोलचे भडकलेले दर याबद्दल 2 मिनिट बोलले जाते व आर्यन रोज किमान 20 तास चघळला जातो. IPL व World कप च्या झगमगाटासमोर शेतकऱ्यांच्या व्यथा झाकोळल्या जात आहेत. शेवटी एकच वाटते जे चालले आहे ते आपल्याला कोठे घेऊन चाललं आहे हे माहीत नाही, कदाचित अफगाणिस्तान ते तालिबान असा प्रवास आपण तर करत नाही ना?

    ReplyDelete
    Replies
    1. एक रेख लहान करण्यासाठी दूसरी रेख मुद्दामहून मोठी केली जात आहे. हे आवडलं. अर्थातच परिस्थिती गंभीर आहे. तालिबान होऊ इथपर्यंत आपली पाळेमुळे खराब झाली नाहीत असं मला वाटतं. या आधीही असे सत्तापिपासू जनतेने घरी बसवले आहेत इथून पुढेही बसवले जातील. हा आशावाद इतिहासाला पाहून माझ्यात भिनला आहे. राहिली गोष्ट प्रवासाची तर जसे तुम्ही नमूद केले तसे निसंशयी हा प्रवास तालिबानच्या रस्त्यावर आहे

      Delete

Post a Comment