विसाव्या शतकातील दुनिया काय होती ?
आर्थिक, राजकीय सत्तेच्या लालसेपोटी पछाडलेली साम्राज्ये रक्ताच्या थारोळ्यात आपले मार्ग शोधत असताना एक माणूस उठतो, अहिंसा आणि सत्याची कास धरतो, ज्यांच्या तथाकथित साम्राज्यावर अस्त होत नाही अशांच्या डोळ्यात डोळे घालतो ही गोष्टच हास्यास्पद होती. ना सत्ता ना सेना, सोबत अहिंसा आणि त्यातूनी असणारा सत्याचा शोध. गांधीवाद हा वास्तववाद नाही हे त्याकाळी दात काढत कुणीही सांगू शकले असते मात्र एका नव्या क्षितिजाच्या दिशेने मार्गक्रमण असलेल्या गांधी नावाच्या विचाराला ठाऊक होत की सत्याचा भास्कर उगवणार आहेच.
संत, राजकारणी का तत्वज्ञ ? कदाचित एखाद्या अमुक उपाधी मध्ये गांधी कैद होतच नाहीत. एक स्वंतत्र वलय असलेला गांधी नावाचा विचार याच्या पलीकडचा आहे.बरेच जण तत्वज्ञान्यांच्या पंक्तीत बुद्ध आणि सॉक्रेटीस सोबत गांधींना बसवतात पण गांधी अजूनही लांब पुढे आहेत. दर्याचा एखादा थेंब आपल्याला माहीत असावा इतकेच गांधी तुम्ही आम्ही जाणतो.
भारताने गांधींना का उचलून धरले ? गांधी नावाचा विचार एवढ्या व्यापक प्रमाणावर का आपलासा वाटतो ? याचे उत्तर हे आहे की या देशाच्या मातीत गांधी नावाची पाळेमुळे आहेत, अगदी खोल. ती न राहावी म्हणून कैक कट केले गेले असले तरीही ती शाबूत आहेत. गांधीजींनी जो विचार उचलला होता तो 'आयडिया ऑफ इंडिया' होता. या देशातल्या अस्तित्वाचा आणि अस्मितेचा प्रश्न म्हणजेच गांधीवाद होता. एकटा गांधीवाद इतक्या वर्षांनी देखील लढायचे बळ देतो, किंबहुना तो जिंकायचे बळ देतो. असा विचार नसानसांत उतरून जातो. तो तमाम जणांचे इमॅजिनेशन कॅपचर करतो. अशी श्रेष्ठता एखाद्या विचारसरणीला लभण्यासाठी त्यात कमालीचा प्रामाणिकपणा देखील लागतो.
गांधीजींनी दिलेली सात सामाजिक पापकर्म म्हणजे स्वंतत्र ग्रंथ आहेत. या सात वाक्यांचा मतितार्थ जरी कळला तरी आयुष्य जगण्यासाठी ते पुरेसे आहे.यातील एक तत्व असे आहे की -
''तत्वविहित राजकारण हे पाप आहे.''
या वाक्यात कमालीची ताकत आहे. आजच राजकारण मग ते जागतिक असो किंवा राष्ट्रीय किंवा स्थानिक, कुठल्या तत्वांवर उभे आहे हा प्रश्न आपण कितीदा आपणाला विचारतो ? गांधीजींनी राजकारण आणि नैतिकता या भिन्न बाबी आहेत हे कधी मानले नाही. आजच्या राजकारणात काय नैतिकता आहे का ? सत्ता हेच सर्वस्व अन् सत्तेतून स्वार्थ साधण्यामागे आतुर राजकारण्यांमध्ये कितपत नैतिकता असते ? एका पक्षातून दुसऱ्या पक्षात वाटेल तसे उड्या मारणाऱ्या बेडकांमध्ये किती नैतिकता असते ? यावर एक मतप्रवाह असा मांडला जातो की राजकरण हे शेवटी सत्तेसाठी असते. सत्ता मिळवून ती काबूत ठेवण्यासाठी आणि मग टिकवण्यासाठी राजकारण केले जात असल्याने सत्ता हे राजकारणाचे केंद्र आहे.गांधीजींनी इथेच तर प्रकाश टाकला आहे. निर्विवादपणे राजकारण हे सत्तेसाठी असेल तरी त्यात नैतिकता हवीच. नैतिकता नसेल तर राजकारणाला देखील अर्थ नाही. असे राजकारण रयतेचे काय भले करणार आहे ? नैतिकता डिफाइन करताना गांधी म्हणतात की नैतिकतेचा अर्थच गोष्टी कशा असल्या पाहिजे
( OUGHT TO BE ) असा आहे. राजकारणातून हिंसा लुप्त व्हावी तेव्हा कुठे सत्याचा भास्कर उगवेल म्हणणाऱ्या गांधींच्या देशात आजही जातीय धार्मिक दंगली होतात, किंबहुना घडवल्या जातात आणि दंगलीत पडलेल्या प्रत्येक खुनानंतर आपण गांधी या विचारापासून दूर जातो. गांधीजी राजकारणाकडे एक सामाजिक आणि नैतिक उत्कर्षाचा मार्ग म्हणून पाहत होते. आजच्या भारतात सत्तेसाठी हपापलेले स्वार्थी राजकारणी पाहिले की गांधी फार दूर गेल्याचे प्रकर्षाने जाणवत राहते.
एका युनिव्हर्सिटी मध्ये विद्यार्थी आंदोलन सुरू होते. प्रशासन मागण्यांना भीक घालत नव्हते. गोल्ड मेडल मिळणाऱ्या विद्यार्थ्यांनी सत्कार सोहळ्यावर बहिष्कार टाकला. गोल्ड मेडल साठी दिन रात एक केलेल्या विद्यार्थ्यांनी हे का केले असावे ? कारण अशा विद्यार्थ्यांमध्ये गांधी असतो. त्यांना सत्याग्रहाचा रस्ता ठावूक असतो. ते कॅम्पस मध्ये जाऊन फोडाफोडी करत नाहीत. त्यांना अहिंसा हा मीन्स आणि सत्य हा आऊटपुट हे सामर्थ्यशाली समीकरण ठावूक असते. त्यामुळे होत एवढच की गांधी पुन्हा पुन्हा नव्याने जन्म घेत राहतो, नव्या ताकतीने. महात्मा गोळीने मरत नाही, हे कळावे एवढी अक्कल ना नथुरामला होती ना त्याच्या विचारसरणीला. म्हणूनच आज विध्यार्थी बोलू लागला, रीजन आऊट करू लागला की तो देशद्रोही, तुकडे तुकडे गँग होतो. पण तरीही गांधी काही मरत नाही. मुळात गांधी हे बीजच संघर्षाच्या भूमीत जन्माला आले आहे.
गांधीजी काळाच्या कित्येक पावूल पुढे चालणारे नेते होते.
पर्यावरण हा विषय आता डोक्यावरून पाणी चालल्यावर जग घेऊन नाचत असताना गांधींजी तेव्हाच यावर लीहले, बोलले होते. ज्या आत्मनिर्भरतेविषयी आज एवढे बोलले जात आहे ते गांधींनी तेव्हाच खादी आणि ग्रामीण उद्योगाला चालना द्या म्हणून सांगितले होते.आजच्या जागतिक अर्थव्यवस्थेचे मुक्त व्यापार करार हे सत्य आहे. आज आपण या समीकरणाशी मिळते जुळते होत नाही ( आरसीइपी मधून भारत बाहेर पडला ) याचे कारण आपली व्यापारातील तूट वाढत आहे. ही तुट वाढण्याचे कारण आपले स्थानिक उत्पादन बाहेरच्या उत्पादनाशी स्पर्धा करू शकत नाही. कदाचित या देशाला गांधी समजला असता तर ग्रामीण अर्थकारण अन् त्यासोबत अर्थव्यवस्था देखील वेगळीच आयामे खेचून घेऊन येऊ शकत होती. स्वच्छ भारत हे आणखी एक उदाहरण. स्वच्छतेला गांधींनी स्वातंत्र्यापेक्षा अधिक महत्त्व दिले होते. अजुनी एक गोष्ट म्हणजे, आज सत्तेचे एकीकरण होत असताना ( एक देश, एक नेता, एक मोर, एक दाणा ) गांधीजींनी तेव्हाच सत्तेचे विकेंद्रीकरण अन् त्यात सामावलेली भारतीय राज्यसंघाची ताकत स्पष्ट केली होती. यातच प्रामुख्याने स्वराज आणि सर्वोदय दोन्ही दडले आहे.
गांधी ही फार मोठी ताकत आहे. लाख नथुराम जन्मल्यावर देखील गांधी नावाच्या विचारावर ओरखडा देखील येणार नाही. ३० जानेवारी १९४८ साली महात्मा सोडून गेले आणि संयुक्त राष्ट्राने आपला झेंडा अर्ध्यावर तर घेतलाच शिवाय एक सेशन देखील स्थगित केले.काय होते या पंचा नेसलेल्या एका फकीराकडे ? ना सत्ता, ना पैसा, ना सेना.
होते फक्त विचार, सत्याची कास आणि अहिंसा नावाचे शस्त्र. ही ताकत आहे गांधी नावाच्या विचाराची. भिती ही हुकूमशहांना असते. म्हणून हिटलर गोळ्या झाडून घेतो. स्वर्गीय विचारांची मशाल हाती धरलेला युगपुरुष मात्र 'हे राम' म्हणून जातो. हा फरक आहे. यात कमालीचे श्रेष्ठत्व आहे. नेल्सन मंडेला असो किंवा मार्टिन ल्यूथर किंग ज्यू. असो अशा क्रांतिकारकांचे प्रेरणस्थान म्हणून ही एक व्यक्ती, नव्हे विचार उभा ठाकतो. यातून सारे विश्व कसे गांधीमय आहे याची देखील प्रचिती येते.
प्रश्न हा आहे की, स्वंतत्र भारताचा पहिला अतिरेकी नथुराम गोडसेने महात्मा यांच्यावर गोळ्या का चालवल्या ? प्रश्न गोडसेचा नाही, विचारसरणीचा आहे.
"रघुपती राघव राजाराम, पतीत पावन सीताराम"
इथपर्यंत ठीक आहे, याच्या पुढे ज्या क्षणाला
" ईश्वर अल्लाह तेरे नाम, सबको संमती दे भगवान "
जोडले जाते तेव्हा गांधी मारला जातो.
अतिरेकी, हिंसा आणि तिरस्कार ही मूल्ये घेऊन चालणाऱ्या या विचारसरणीला प्रेम सहन होत नाही.
संकुचित मनोवृत्तीने मग गांधींवर गोळ्या झाडल्या जातात अन् गांधी 'हे राम' म्हणुनी जातो. माझा राम गांधींच्या
' हे राम ' मध्ये आहे. आजकाल नथुरामाची पिलावळ जो ' जय श्री राम ' म्हणते त्यात नाही. या दोन्ही मध्ये कमालीची तफावत आहे. एकात प्रेम आहे एकात तिरस्कार. माणसाचं आयुष्य ते किती, आपल्याला तरी शेवटपर्यंत प्रेमच पुरेल. शिवाय नथूरामाच्या पिलावळीने हे देखील जाणले पाहिजे की त्यांचे अस्तित्व आज शिल्लक जर आहे तर ते फक्त आणि फक्त गांधी या विचारामुळे आहे. लोकशाही आणि असहमती ही तत्वे गांधीवाद उचलून धरतो. जरी यांनी गोळ्या घालून असहमती दर्शवली असली तरीही गांधीवाद त्यांना माफ करतो.
याहून जगाच्या पाठीवर सामर्थ्य कशात असते ?
गांधी विरुद्ध आंबेडकर, गांधी विरुद्ध भगत सिंह, गांधी विरुद्ध सुभाषचंद्र किंवा गांधी विरुद्ध शास्त्री ( ते ही शास्त्री यांची जन्मतारीख २ ऑक्टोंबर म्हणून ) अशा बायनरी का सेट केल्या जातात ? गांधी लुप्त व्हावे म्हणून पण तरीही तसे होत नाही. सख्ख्या भावांचे पटत नाही. हा तर देश आहे. इथे वैचारिक मतभेद असणे किंवा मार्ग वेगळे असणे साहजिक आहे मात्र या साऱ्यांची ' मंजील ' एक होती. हे मात्र सांगितले जात नाही. यातल्या प्रत्येकाला गांधीसाठी आदर होता. गांधीजी देखील यातल्या प्रत्येकाला आदराने पाहत होते. सुभाष बाबूंनी तर गांधींना ' महात्मा ' ही पदवी दिली होती. गांधी विरोध म्हणून यांना भगत सिंह, बाबासाहेब किंवा सुभाष बाबू लागतात मात्र, यांच्या स्वप्नातील भारत मात्र यांना नको असतो. हे यांचे राजकारण आहे. विरोधाभासी अन् तितकेच पोकळ. अनैतिकतेने आणि क्रूरतेने भारलेले.
गोडसे अमर रहे असा गांधी जयंतीला ट्विटर वर ट्रेण्ड करून गांधी मरत नसतो हे आयटी सेलला कळत नाही.
ज्याला गोळी मारून संपवता आले नाही तो ट्रेण्ड करून तुम्हाला याच काय लाखो जन्मी देखील संपणार नाही.
अल्बर्ट आईन्स्टाईन गांधीजींना उद्देशून म्हणाले होते की -
"येणाऱ्या पिढ्यांना विश्वास बसणार नाही की असा हाडा-मासाचा माणूस या पृथवीतलावर अस्तित्वात होता"
अल्बर्ट आईन्स्टाईन कसा मूर्ख आहे हे पण आयटी सेल तुम्हाला आम्हाला सांगू शकते. आपणही सारे व्हॉट्सअँप युनिव्हर्सिटीची डॉक्टरेट घेतले आहोतच. ज्या विचारसरणीने महात्मा मारले आज ती विचारसरणी देशात सत्तेत आहे. कधी नव्हे इतकी ताकत तिच्यात आहे आणि असे असले तरीही गांधी नावाच्या विचाराचे ते किंचितही बिघडवू शकले नाही. त्या छाताडाची ( सुमारे ५६ इंच ) काय बिशाद, गांधी विरोधी ब्र देखील उच्चारेल.
लाखाचे सुट घालून पंचा नेसलेल्या फकीरापुढे झुकावेच लागते. तेही अदबीने.
गांधी विचार अमर आहे. गांधी काळजाचा विषय आहे. तो वाचताना, लिहताना, मनन चिंतन करताना उर भरून येतो. अश्रू डोळ्यात उभे राहतात. या देशाचा तो पाया आहे. जयंती फक्त निम्मित आहे, गांधी विचाराशिवाय या देशातील पान देखील हलत नाही ही वस्तुस्थिती आहे. ज्या देशाने संघर्षातून फिनिक्सला लाजवेल अशी भरारी घेतली आणि त्या संघर्षाचा एक प्रचंड हिस्सा गांधी राहिले आहेत त्या देशात जन्म घेतला याहून थोर भाग्य काय.
- केतन गजानन शिंदे ( राजन )
#शनिवार_रात_तुमची_आमची_बात



मस्तच
ReplyDeleteग्रामीण अर्थव्यवस्थेसाठी गांधींचा स्वदेशीचा मार्ग या मुद्द्याशी असहमत. पण अप्रतिम लिखाण. काही इंग्रजी शब्द वापरले आहेत, त्याऐवजी मराठी शब्दांचा वापर केला तर अजून प्रभावी लिखाण होईल.
ReplyDeletePratekala ha lekh vachnyachi garaj
ReplyDeleteKhup chan
खरंच खुप छान लिहिलंय 👌👌👍👍
ReplyDelete