निरोप एका क्रांतीकारी वादळास

 


के आर गौरी अम्मा हे क्रांतीकारी साम्यवादी नेतृत्व काळाच्या पडद्याआड गेले आणि एक खंत उर भरून राहिली. संघर्षाच्या उदरातून अशी नेतृत्व जन्म घेत असतात. एझावा या मागासवर्गीय समाजात जन्म झालेल्या अम्मा ह्या त्यांच्या समाजाच्या पहिल्या वकील होत्या. स्त्री आणि राजकरण हे समीकरण जेव्हा समाजात मुरल नव्हत तेव्हा अम्मा राजकारणात उतरल्या.

1952 च्या त्रावणकोर कोचीन निवडणुकीत त्या सर्वप्रथम निवडून आल्या. 1957 झाली जागतिक राजकीय इतिहासात एक न भूतो अशी घटना घडली. साम्यवादी प्रथमच मतपेटीतून सत्तेत येवू शकले. इमएस नंबुद्रीपाद सरकारमध्ये त्या मंत्री होत्या. याच दरम्यान थॉमस या साम्यवादी नेत्याशी त्यांचा विवाह झाला. 

1964 साली जागतिक साम्यवादी विचारसरणीत मंथन होऊ लागले. चीन आणि रशिया हे दोन्ही साम्यवादी देश विरोधात उभे राहिले. अशात भारतीय साम्यवाद विचारसरणीमध्ये देखील मंथन होत होते. साम्यवाध्यांमध्ये काँग्रेसप्रणीत गट जो डांगे यांच्या नेतृत्वाखाली होता त्यांच्याशी बहुतांश नेते फारकत घेवू लागले. 1964 साली कम्युनिस्टांचे तुकडे झाले. साम्यवादी दोन गटात वाटले गेले. याला बहुतांश करणे आहेत. या विषय स्वतंत्र अभ्यासाचा आहे मात्र या नंतर सिपीआय मधून फुटून सीपीएम हा नवीन पक्ष स्थापन झाला. अम्मा यांनी सीपीएम ची वाट धरली. थॉमस हे मुख्य पक्षात राहिले आणि हेच पुढे घटस्फोटाचे अनेक कारणांपैकी एक कारण झाले. मुळात साम्यवाद ही विचारसरणी ज्या कारणासाठी निर्माण झाली होती त्या उद्दिष्टांसाठी उरून पुरणे महत्त्वाचे होते. काँग्रेस धार्जीन गट कितपत साम्यवादी चळवळीस पुरून उरणारा होता याला नंतरचा इतिहास साक्ष आहे. 

प्रसंगी नवऱ्याच्या विरोधी जावे लागले , घटस्फोट व्हावा लागला मात्र विचारसरणी सोबत कुठलीही तडजोड केली नाही. इथे आणखी एक पैलू अम्मा यांचा ध्यानात घेतला पाहिजे, त्यांच्यावर पुरुषी मानसिकतेचा अंकुश काम करत नसावा. त्या मूलतः स्वतंत्र होत्या. ही बाब या साठी ध्यानात घेतली पाहिजे कारण हा त्यांच्या स्वभावाचा पैलू त्यांच्या आणि एकूणच राज्याच्या आणि मी म्हणेन की देशाच्या भवितव्याचा महत्त्वाचा घटक बनून राहिला.

लँड रीफॉर्म बिल हा अम्मा यांच्या जीवनातील सर्वात क्रांतिकारी निर्णय होता. हा क्रांतिकारी निर्णय घेण्यासाठी तुम्हाला हाडाचा साम्यवादी असणे गरजेचे आहेच मात्र यासाठी तुम्हाला जमिनीवर असणे देखील गरजेचे आहे. मातीतून वर आलेले सर्वसामान्य नेतृत्व असामान्य बदल घडवण्याची ताकत ठेवत असते. केरळ विधानसभेत मान्य झालेले बील त्यावेळी राष्ट्रपती यांनी नाकारले. पुन्हा काँग्रेस सत्तेत असताना त्यांनी या बिलात अनेक बदल केले. जमीनदारांना सूट दिली. पुन्हा डाव्यांनी सत्ता हस्तगत केली. या वेळी अम्मा यांनी पुन्हा बील जसेच्या तसे पास केले. त्यांना दहा वर्षे संसदीय संघर्ष करावा लागला मात्र अखेर त्यांनी सुमारे 35 लाख लोकांना जमीन मिळवून दिली. सुमारे 1 लाख एकर अतिरिक्त जमीन शिल्लक राहिली ज्याची नंतर पुन्हा वाटणी करण्यात आली.केरळच्या इतिहासातील हा क्रांतिकारी निर्णय होता. लोकांकडे जमीन आली. आपोआप जीवनाचा स्तर उंचावला. मूल शाळेत जावू लागली. साक्षरता वाढली. एकूणच राज्य विकसित झाले. 

87 साली मुख्यमंत्री म्हणून अम्मा यांची चर्चा होऊ लागली. तसे नारे दिले जावू लागले होते. त्यांचाच पक्ष त्यांचे खच्चीकरण करू लागला. 94 साली अम्मा यांची पक्षातून हकालपट्टी झाली. इएमएस यांचा हा कट होता असे अम्मा यांचे म्हणणे होते. काहीजण अम्मा यांच्या अति स्वतंत्र भूमिकेला यासाठी जबाबदार ठरवतात तर काहीजण त्या पक्ष सोबत घेवून चालत नव्हत्या असा आरोप करतात. अम्मा म्हणतात इएमएस यांना समाजाच्या म्हणवल्या जाणाऱ्या लोअर क्लास मधील नेतृत्व पुढे यावं अस वाटत नव्हत. याला योगायोग म्हणजे अम्मा यांना डावलून नयनार यांना मुख्यमंत्री पद मिळाले, ते म्हणवले जाणाऱ्या अप्पर क्लास मधून येतात. राजकारणात योगायोग होत नाहीत ही गोष्ट आपण इथे समजली पाहिजे. या गोष्टीला आणखी एक पदर असावा तो म्हणजे अम्मा यांच ' स्त्री ' असणे. यातून एक अर्थ असाही होतो की तथाकथित साम्यवादी म्हणवणाऱ्या नेत्यांचे विचार किती पोकळ असू शकतात. अम्मा कधीही विचारधारेशी तडजोड करू शकल्या नाहीत. त्यांना पक्षातून हकालपट्टी सहन करावी लागली , मुख्यमंत्री पद त्यांचे असून देखील सोडावे लागले. पुढे त्यांनी स्वतंत्र पक्ष काढला. आयडीएफ सोबत गेल्या.नंतरही त्या मंत्री राहिल्या मात्र त्या नेहमी समाजात आपल्याला एक राजकीय नेतृत्व म्हणून काय करायचे आहे याबद्दल क्लिअर होत्या. हे एक असे नेतृत्व आहे ज्याच्यावर कितीही लिहिल, वाचलं ते कमी पडेल. साम्यवादी चळवळीची खरी ओळख म्हणून अम्मा यांचं योगदान इतिहासात एक प्रेरणा म्हणून राहील.भारतातल्या साम्यवादी विचारसरणीने, तसेच विविध डाव्या विचारांच्या शेतकरी, कामगार , विद्यार्थी संघटनांनी भविष्यात आपली दिशा ठरवत असताना ' अम्मा ' हे व्यक्तिमत्त्व केंद्रस्थानी ठेवले पाहिजे.

अखेरचा लाल सलाम 

YOU WILL BE MISSED COMRADE ❤️

REST IN POWER ✊


- केतन गजानन शिंदे ( राजन )

Comments

Post a Comment