मुजोर सत्तेच्या मुसक्या या आधीही आवळल्या आहेत

खेला शेष 



२ मे २०२१ , आजचा दिवस भारतीय राजकारणाच्या इतिहासात एक महत्त्वाचा दिवस म्हणून कायम लक्षात ठेवला जाईल. निकालाचा दिवस नेहमी कुणाला तरी मातीत लोळवतो , कोण तरी विजयी शड्डू ठोकतो. लोकशाहीत हार किंवा जीत होत असते परंतु निकालानंतर जी राजकीय समीकरणे बदलतात ती एकूणच भविष्यावर अतिशय परिणामकारक असतात. 
कोरोनाच्या दुसऱ्या जीवघेण्या लाटेत लोकशाहीचा उत्सव साजरा झाला. आज बंगाल मध्ये चाचणी केली जाणार प्रत्येक दुसरा माणूस पॉझिटिव्ह येत आहे. खरंतर हे नाटक आपण पाहिलंच आहे. लाखोंच्या सभा आणि त्यापुढे माइक फाटेपर्यंत भाषण देणारे, सत्तेसाठी हपापलेले , म्हणवले जाणारे नेते.
असो , थेट वळूया बंगालकडे ! 35 वर्ष डाव्यांनी बंगालवर राज्य केले. सत्तेसोबत माज येतो. डावे याला अपवाद नाहीत. युथ काँग्रेस मध्ये काम करणाऱ्या एका तरुणीने मुजोर सत्तेच्या मुसक्या आवळायला सुरुवात केली. त्या तरुणीवर जीवघेणे हल्ले झाले. त्या तरुणीने पण केला. 2011 विधानसभा निवडणुकीत , मुजोर डावे मातीत लोळवले. ही तरुणी म्हणजेच ममता बॅनर्जी उर्फ दीदी. अवघ्या बंगाल ने आपल सर्वस्व दीदींना वाहील. पुढच्या निवडणुकीला म्हणजेच 2016 च्या विधानसभा निवडणुकीत डाव्यांनी हा पराभव वैयक्तिक घेतला. परिणामे डाव्यांनी आपले दुवे बाजूला न सारता दीदींचा पराभव कसा होईल यावर अधिक लक्ष केंद्र केले. लोकशाहीत पराभव मान्य न करणे हीच सर्वात मोठी हार असते. कुठेतरी डाव्यांच्या अहंकाराने ही हार मान्य केली नाही. परिणामे डावे अजून ढासळले. काँगेसने मुसंडी मारत ४४ जागा घेतल्या , डावे ३३ वर आले. 
दरम्यान देशात वारे फिरू लागले होते. नरेंद्र मोदी नावाची लाट देशात आली होती. भाजप दिवसेंदिवस सामर्थ्यशाली होत होता. तळागाळात कार्यकर्ते झपाट्याने काम करत होते. मीडिया , मनी , मसल आणि मॅनेजमेंट ( कदाचित मशीन - ईव्हीएम सुद्धा ) लोकशाहीचा ताबा घेत होती. बाकी धार्मिक ध्रुवीकरण वगैर होतच. अशात भाजपला बंगालमध्ये 42 पैकी 18 लोकसभा जागा मिळाल्या. 40% व्होट शेअर भाजपला मिळाला. तसेच तृणमूल आणि डावे फोडून विधानसभेत देखील भाजपचा आकडा ३१ झाला. 2019 ते 2021 या कालावधीत जी जी राजकीय समीकरणे बंगालमध्ये फिरली त्याचा परिणाम दोन मे म्हणजेच आजचा दिवस आहे. मागच्या विधानसभेला तीन जागा असलेला भाजप आज सत्तेचे दावे करत होता. परंतु ही झेप ३ जागा भरून थेट ८० जागे  पर्यंतची नसून, 2016 विधानसभा ते 2019 लोकसभा या कालावधीत भाजपाने मारलेली मुसंडी आहे. प्रधानमंत्री, गृहमंत्री, कित्येक मुख्यमंत्री , अनेक वरिष्ठ नेते आणि अगणित कनिष्ठ नेते भाजपाने रिंगणात उतरवले. एक अतीतटीच आव्हान भाजपने उभ केलं. 2019 च्या पार्श्वभूमीवर गृहमंत्री दोनशे अधिक जागांनी सत्ता स्थापन करणार असे दावे केले. तृणमूल काँग्रेसला फोडून , डाव्यांना फोडून कुठल्याही परिस्थितीत भाजप सत्तेसाठी पेटून उठला होता. मात्र 2019 च्या लोकसभा निवडणुकीनंतर दीदींनी आपल्या चुकांवर पांघरूण न घालता , लोकसभेत झालेल्या चुका स्वीकारून, त्यावर काम केले. दहा वर्ष सत्तेत असून देखील दीदींनी ही निवडणूक अगदी शून्यातून लढली त्याचा परिणाम म्हणजेच भाजपची झालेली टांगापलटी आहे. 
2018 साली आलेले अंफान वादळ असो , कोरोना असो , एनआरसी चा मुद्दा असो किंवा धार्मिक ध्रुवीकरण असो यामधील कुठलाच प्रश्न दीदींना अंगलट आला नाही. उलट भाजपाला हे प्रश्न अंगलट आले आहेत. धर्माच्या नावाखाली , तोडून फोडून सत्ता येत नसते , आली तरी टिकत नसते. वादळाच्या वेळी तृणमूलने मोठ्या प्रमाणावर जनतेची निराशा केली होती. हे लोकांचे प्रश्न उचलून धरले असते तर कुठेतरी भाजपाला अजून फायदा झाला असता. 
हिंदुत्वाचे राजकारण जनतेला कळले आहे. जनता वेडी राहिली नाही. या निवडणुकीने हे देखील स्पष्ट केले आहे.
प्रशांत किशोर नावाचं आणि राजकीय वर्तुळात 2014 पासून कार्यरत असणारे वादळ या निवडणुकीतील गेमचेंजर ठरल. काही महिन्यांपूर्वी प्रशांत किशोर यांनी आपल्या ट्विटर वरून ते म्हणाले की - भाजपा दोन आकड्यांच्या वर जागा घेऊ शकणार नाही. असे झाल्यास मी माझ्या कामाचा त्याग करेन. हे विधान तेव्हा अतिशय हास्यास्पद होत. ' मोशा ' ( मोदी शहा ) संपूर्ण ताकतीने उतरले असताना आणि लोकसभेत भाजपाला मिळालेल्या यशाला धरून हे कुठेच कुणाला पचण्यासारख नव्हत परंतु आज जेव्हा भाजप 80 जागा देखील ओलांडू शकला नाही तेव्हा प्रशांत किशोर यांनी सर्वांना चिडीचाप केलं आहे. 
भाजपसारख्या सामर्थ्यशील पक्षाला आव्हान देणे फार महत्त्वाचे आहे. ममतादीदी ज्या शक्तीने आज भाजपाच्या विरोधात उभ्या राहिल्या , लढल्या आणि जिंकल्या हे दाखवून देत की लोकशाहीत ' लोक ' सर्वस्व आहेत.धर्माच्या नावाखाली , जातीय समीकरण आखून आजही निवडणुका जिंकल्या जातात हे जरी खरं असलं तरी या देशाची लोकशाही अजूनही शाबूत आहे. आज एकूणच विरोधीपक्ष आमच्यासोबत मीडिया नाही, मॅनेजमेंट नाही वगैरे गळे काढत असतात. परंतु या निवडणुकीने स्पष्ट केले आहे की ज्याच्याकडे जनादेश आहे त्याला मिडीया मॅनेजमेंट आदीची गरज पडत नाही. मीडिया मॅनेजमेंट जरूर आपला रोल प्ले करतात परंतु तो फारसा परिणामकारक ठरत नाही. आपल्या मुलाखतीत आज प्रशांत किशोर बोलत असताना म्हणाले - मीडिया आणि मॅनेजमेंट भाजपला साठ जागांवरून 80 जागा आणि पर्यंत घेऊन जाऊ शकतात परंतु साठ जागांवरून दोनशे जागांपर्यंत कधीच घेवून जावू शकत नाहीत. 
अर्थात दोनशे पर्यंत पोहोचणारा हा लोकांच्यातून आलेला असतो, लोकांसाठी आलेला असतो.
आणि या सगळ्यात फक्त भाजप पराभूत झालेला नाही. डावे आणि काँग्रेस दोघेही सपशेल उताणे पडले आहेत. खरंतर ज्या राज्यात डाव्यांनी पस्तीस वर्ष राज्य केलं आज त्याच राज्यात डाव्यांचा एकही उमेदवार आला नाही, कॉंग्रेसची देखील तीच हालत आहे. कुठतरी या पक्षांना आत्मचिंतन करण्याची गरज आहे. आमचा वोट शेअर इतका आहे , केवळ असे म्हणून चालत नाही. तुम्ही विधानसभेत नाहीच तर तुमच्या अमुक तमुक वोट शेअरचे प्रतिनिधित्व कोण करणारे. असो , आवरत घ्यायला हवं. या निडणुकीचा एक धागा थोडी आहे. बाकी मुजोर भाजपाला रोखण्यात आणि या देशापुढे लढावे कसे याचे उत्तम उदाहरण आज ममता दीदी यांनी कृतीतून दिले आहे.
आज दिवस लोकशाहीचा आहे !
लोकशाहीच्या पाईकांचा खरा उत्सव आहे !
बाकी लढाई सुरू राहील ✊

- राजन

 







Comments

Post a Comment